विवेक तोटेवार, वणी: सवलतीच्या दरात दुकाची खरेदी करून देण्याचं आमिष दाखवून एका महिलेनं मारेगावातील एका शिक्षकाला गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला नागपुरातून अटक केली आहे.
दिवाकर राऊत हे मारेगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहे. ते एका शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्षही आहे. काही दिवसांपूर्वी दिवाकर राऊत यांची नागपूर येथील कविता कुंभारे (40) यांच्याशी भेट झाली. महिलेने राऊत यांना नाबार्डमार्फत 20 टक्के सवलतीच्या दरात दुचाकी व चारचाकी मिळत असल्याचे सांगितले. तसेच हे वाहन घेऊन देण्यास मी आपली मदत करते असेही बोलली. तिच्या या बोलण्यावरून राहुत यांनी स्वतःसाठी व त्यांच्या सहका-यासाठी 50 दुचाकी यवतमाळ, वणी व मारेगाव येथून खरेदी केल्या.
यातील केवळ 30 दुचाकींची नोंदणी परिवहन विभागाकडे करण्यात आली होती. तर उर्वरित 20 वाहनांची नोंदणींचे शुल्क महिलेने जमा केले नाही. त्यामुळे ती रक्कम राऊत यांना भरावी लागली. ही रक्कम 8 लाख 80 हजार रुपये इतकी होती. महिनेने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर राऊत यांनी याबाबत महिलेला विचारणा केली. मात्र तिच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर राऊत यांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली.
राऊत यांच्या तक्रारीवरून महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी या महिलेला पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. या महिलेचा खरच नाबार्ड बँकेशी संबंध आहे की ही महिला तोतया आहे यासोबतच या महिलेनं आणखी कुणाला फसवलेय याचा तपास सध्या पोलीस करीत आहे.