नशेच्या वस्तूंचा पुरवठा रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान
पालक, शिक्षकांनी मानले 'वणी बहुगुणी'चे आभार
सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. ‘वणी बहुगुणी’वर याबाबत वृत्त प्रकाशित होताच पालक सतर्क झाले आहेत. तर गांज्या व अमली पदार्थ पुरवठा करणा-यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांपुढे आहे. आता पोलीस यावर काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरुणाई नशेच्या आहारी ही बातमी वणी बहुगुणी या न्यूज पोर्टलवर लागताच दिवसभर फोन, मॅसेज करून पालक, शिक्षक यांनी वणी बहुगुणीचे आभार मानले.
आदिवासीबहुल तालुक्यातील तरुणाई गांजा, अफीम, कोरेक्स व आयोडेक्ससारख्या अमली पदार्थार्ंच्या विळख्यात सापडली आहे. जंगल शिवारासह काही ले-आऊट नशेचे अड्डे ठरत आहे. मात्र पोलीस अनभिज्ञतेचे सोंग घेऊन बसल्याने तरुणाईचे आयुष्य अंधकारमय झाले आहे.
आधुनिक युगात युवक, युवती तसेच हायस्कूल व सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फॅशनचे मोठे वेड लागले आहे. हिंदी चित्रपट, टीव्ही चॅनलवरील सिरीयलमधील अश्लिल कृत्य व नशा करणे आदी गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर पडला आहे. आपण कोणत्या मार्गावर जात आहो, याचे भानही त्यांना राहिलेले नाही. नशेकरिता आजचे तरुण एवढे पुढे गेले की, त्यांनी नशेकरिता वेगवेगळे शोध लावले आहे.
गांजा, अफीम या गोष्टी ऐकायला मिळतात, परंतु तालुक्यात या दोन नशिल्या वस्तू व्यतिरिक्त खोकल्याकरिता वापरण्यात येणारे कोरेक्स औषधाचा नशेकरिता वापर होताना दिसत आहे. तर आयोडेक्स या क्रीमचा शरीराला दुखणे, सुजन येणे याच्यावर मालिशकरीता वापर होतो. मात्र, हा मलम ब्रेडला लावून खाण्यात येत आहे. शिवाय, बॅटरी (टॉर्च) करिता वापरणारे सेलही नशेचे साधन बनले आहे. त्याला फोडून त्यातील पांढऱ्या रंगाची पावडर (एसिडसारखा) काढून एक ग्लास पाण्यात टाकून पाणी गाळून प्राशन केले जात आहे.
परिसरातील शालेय विद्यार्थी गांजा व अफीमच्या नशेत गुरफटले असून ते आपल्या जीवनाशी खेळत आहे. या नशेत काही तरुणीसुद्धा असल्याची माहिती मिळाली आहे. मुकुटबन परिसरातील जंगल, ले-आऊटमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यावर तर काही चौकातसुद्धा गांजाची चिलम घेऊन बिनधास्त ओढली जात आहे. कधी पार्टीमध्ये गांजाचा वापर होत आहे तर कधी कधी भर रस्त्यावर चारचाकी थांबवून गाण्याच्या तालावर नाचत चिलमचा दम ओढला जात आहे. एकूणच झरी तालुक्यात ‘दम मारो दम’चे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.