जीवघेण्या आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्याला मदतीचा हात
विजय पवार उचलणार उपचाराचा संपूर्ण खर्च
सुशील ओझा, झरी: अनेकदा पालक मुलांना एखादा आजार झाला तर त्याकडे छोटासा आजार म्हणून दुर्लक्ष करतात. झरी सारख्या आदिवासी बहुल परिसरात लोक अज्ञानातून भोंदूगिरीकडे वळतात. मात्र पुढे तो रोग अधिक वाढतो आणि गंभीर स्थितीवर येऊन ठेपतो. असाच प्रकार झरी तालुक्यात घडला आहे. आज प्रवीण हा चिमुकला जीवघेण्या आजाराशी झुंजतोय.
प्रवीण दौलतराव कुमरे (10) हा चिमुकला झरी तालुक्यातील जुनोणी येथे राहतो. घरची परिस्थिती बेताचीच आहे. आठ ते दहा महिन्यांपूर्वी प्रवीणच्या मानेवर एक छोटीशी गाठ आली. प्रवीणच्या आई वडीलांनी गावातच येणारा एक मारोती नामक बोगस डॉक्टरला दाखवले. त्याने बाहेरचे भूत लागले सांगून उपचार बोगस उपचार सुरू केले. मात्र त्याचा फायदा झाला नाही. कालांतराने एका गाठीच्या तीन गाठी झाल्या व गाठी त्या सर्व गाठी मोठ्या झाल्या. अखेर जे व्हायला नको होतं ते झालं. प्रवीणच्या मानेवरच्या गाठी अखेर मोठ्या होऊन फुटल्या.
जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा प्रवीणच्या पालकांनी प्रवीणला पांढरकवडा येथील रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकूण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. इतक्या दिवसांपासून ते ज्या गाठींना सहजतेने घेत होते त्या गाठी कॅन्सर सदृष्य रोगाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
उपचाराचा खर्च खूप जास्त आहे. आता हा खर्च कसा करायचा हा प्रश्न प्रवीणच्या पालकांना पडला. तेव्हा त्यांना पांढरकवडा येथील निवासी व प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास पवार यांच्याबद्दल कळले. विलास पवार हे गेल्या दोन वर्षांपासून गंभीर रुग्णांच्या उपचाराचा खर्च उचलतात. तसेच रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत देतात. प्रवीणच्या पालकांनी पवार यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी प्रवीणचा मोठ्या रुग्णालयात उपचार करून त्याचा सर्व खर्च उचलणार असे वचन दिले.
विलास पवार यांनी दिलासा देताच प्रवीणच्या पालकांचे डोळे भरून आले. विलास पवार यांनी आतपर्यंत अऩेक कॅन्सरग्रस्त रूग्णांचा तसेच शेकडो मोतीबिंदुच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलला आहे. तसेच अनेक गरीब कुटुंबातील व अनाथ मुलींच्या विवाहाचा खर्च ही त्यांनी उचलला आहे.
14 ऑक्टोबर रोजी प्रवीणला उमरी येथील ख्रिश्चन मिशनरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर तिथे प्राथमिक उपचार सुरू आहे. मात्र डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरला हलवणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे प्राथमिक उपचार झाले की प्रवीणवर नागपूर येथे पुढील उपचार केले जाणार आहे. विलास यांनी प्रवीणच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करून मानव धर्म जोपासला आहे.
डॉक्टरांनी सांगितले की झरी परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. हे उपचार तर चुकीचा करतातच सोबतच सुरक्षेचीही काळजी घेत नाही. इंजेक्शनची एकच सुई (सिरिंज) हे अनेकांना वापरतात. परिसरात मोठ्या प्रमाणात टीबीचे रुग्ण आहेत. त्यामुळे या रोगाचा प्रसार होतो. अशा बोगस डॉक्टरांपासून इलाज करू नका असे ही डॉक्टर म्हणाले.