अखेर राजणीवासीयांची पाण्यासाठी पायपीट थांबली
डॉ. लोढा यांच्याकडून गावक-यांना दस-याची अनोखी भेट
सुशील ओझा, झरी: एकीकडे सरकार घरपोच दारू देण्याच्या प्रस्तावावर विचार करते. मात्र लोकांना गावात पाण्यासाठी पायपीट करावी लागते याकडे दुर्लक्ष करते. याची दखल प्रशासन घेत नाही. स्मार्टफोन, इंटरनेट, अत्याधुनिक तंत्रज्ञान, घरोघरी पोहोचवण्याचा दावा करत असतानाच साधं पाणीदेखील घरापर्यंत पोहोचत नाही हा प्रचंड विरोधाभास आहे. ही गोष्ट आहे झरी तालुक्यातील एका दुर्गम गावाची. इथे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या पुढाकाराने गावक-यांची पाण्यासाठीची पायपिट थांबली आहे. एकप्रकारे हि गावक-यांना डॉ. लोढा यांच्याकडून दस-याची अनोखी भेटच ठरली.
राजणी हे तालुक्यातील दुर्गम भागात असलेलं एक गाव. या गावात पाणी समस्येने गावकरी त्रस्त झाले होते. जवळपास 300 घरांची व अंदाजे 1000 लोकवस्तीचे हे गाव. पाण्याचे एकमेव स्रोत म्हणजे गावाबाहेर असणारी विहीर. विहिरीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. मात्र रात्री अपरात्री, उन्हा तान्हात गावक-यांना एक किलोमीटरची पायपिट करून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावं लागायचं. याचा महिला, वृद्ध सर्वांनाच त्रास व्हायचा. गेल्या अनेक वर्षांपासून गावात पाईपलाईन बसवण्याची मागणी करण्यात आली होती. जे काम प्रशासकीय स्तरावर व्हायला हवे होते ते काही झाले नाही.
गावातील कार्यकर्त्याने डॉ. महेंद्र लोढा यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. ते स्वतः जातीने या अत्यंत दुर्गम गावात गेले. तिथल्या लोकांशी भेटले. अखेर विहिरीवर मोटार टाकून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचं ठरलं. यासाठी आर्थिक भार उचलण्याची जबाबदारी डॉ. लोढा यांनी उचलली. गावक-यांनी त्यांना श्रमदान करून सहकार्य करण्याचं वचन दिलं.
विहिरीपासून गावात पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. विहिरीवर मोटर बसवण्यात आली. विहिरीपासून गावात पाईपलाईन टाकण्यात आली. गावातील प्रमुख चौकात मोठी पाणी साठवण्याची टाकी बसवण्यात आली. अखेर काम पूर्ण झालं. बुधवारी 17 ऑक्टोबरला संध्याकाळी एका कार्यक्रमात पाणीपुरवठा योजनेचं डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी संपूर्ण गावात जल्लोष करण्यात आला. यावेळी महिलांनी डॉ. लोढा आणि त्यांच्या सहका-यांचे औक्षवण केलं. गावात मिठाई वाटण्यात आली. त्यानंतर डॉ. लोढा आणि त्यांच्या सहका-यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. लोढा म्हणाले की…
जल हेच जीवन आहे. हे जीवन सर्वांनाच मिळायला हवे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातही गावातील लोकांना साधं पाणी मिळण्यासाठी पायपिट करावी लागते ही शोकांतिका आहे. गाडगेबाबांनी आपल्या दशसूत्रीत भुकेल्यांना अन्न आणि तहाणलेल्यांना पाणी हे प्राधान्याने सांगितले आहे. तहाणलेल्यांना पाणी देणे हा मानवता धर्म आहे. आणि याच मानवता धर्माचं मी पालन करतो. सत्तेत असो किंवा नसो लोकांचे प्रश्न सोडवण्यास मी कायम तत्पर असेल असंही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, संजय जंबे, महेश पिदूरकर, संदिप धवणे, अंकुश नेहारे यांच्यासह गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष आणि संपूर्ण गावकरी उपस्थित होते.