शारदोत्सवात “स्त्री संतांची मांदियाळी!” व विविध कार्यक्रम
बहुगुणी डेस्क, वणी: देखणी पारंपारिक वेशभूषा, सुयोग्य पटकथा आणि संवाद, नेटके पाठांतर, तंबो-याचे शांत, चित्तवेधक पार्श्वसंगीत, सुरेल गायन, संयमित , भावप्रधान अभिनय, यथोचित सूत्रसंचालन अशा सगळ्याच अंगांनी वणीकर रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा सर्वांग सुंदर कार्यक्रम म्हणजे “स्त्री संतांची मांदियाळी”. वनिता समाजाच्या शारदोत्सवात अर्चना कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारली.
अत्यंत अभिनव उपक्रमात महदंबा ( पल्लवी सरमुकद्दम ), जनाबाई (अर्चना उपाध्ये),मुक्ताबाई (कांचन बुजोणे) बहिणाबाई (प्रणिता पुंड) कान्होपात्रा (संध्या अवताडे) सखुबाई (शुभलक्ष्मी ढुमे) सोयराबाई (संगीता गुंडावार )मीराबाई (रेणुका देशपांडे) आणि वेणाबाई (अपर्णा देशपांडे) या स्त्री संतांच्या भूमिका सादर करण्यात आल्या. या सगळ्यामध्ये विठ्ठलाच्या रूपात उभ्या असलेल्या रमाई ढुमे ने ही प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
प्रत्येकीच्या आगमनापूर्वी अर्चना कुलकर्णी यांनी त्या स्त्री संतांची वर्णिलेली महती, त्या त्या व्यक्तिरेखेची अभिनेत्रींनी मांडलेली वैशिष्ट्ये, शेवटी प्रणिता पुंड आणि अर्चना कुलकर्णी यांनी पार्श्वसंगीत देत एक संत कवियत्रींचा सादर केलेला आहे एकेक अभंग, अशा रूपात श्रोत्यांच्या मनावर कायम कोरला गेलेला हा अभिनव उपक्रम सादर केला गेला. या आगळ्या वेगळ्या स्वरूपात भारतीय संस्कृतीच्या मांडलेल्या या जागराचे संयोजिका भारती सरपटवार यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.