अनेकांच्या चेहऱ्यावर दिवाळीआधीच आली ‘‘मुस्कान’’

जेसीआय वणी सिटीने केले पो. नि. खाडे यांच्या उपस्थितीत गरजुंना कपडे वाटप

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः क्रांतयोगी गाडगेबाबा आणि अनेक संत, महापुरुष गोरगरिबांसाठी झटलेत. ‘‘ज्यास आपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी’’ हा संदेश जगद्गुरू तुकोबारायांनी दिला. या अनेक महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन जेसीआय वणी सिटीने दिवाळीच्या पर्वावर हा कार्यक्रम घेतला.

शनिवारी जवळपास 1000 गरजूंना कपडे, दप्तर, ब्लँकेट, स्वेटर्स, स्कूलबॅग्जचे वाटप केले. पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. स्थानिक जत्रा मैदान हनुमान मंदिरात झालेल्या या उपक्रमाचे आयोजन जेसीआय वणी सिटीचे संस्थापक अध्यक्ष सुमित चोरडिया, राहुल सुंकुरवार, जयेेश चोरडिया, सोहम कोडगिरवार, डॉ. अक्षय तुगनायत, सौरभ उत्तरवार व सदस्य उपस्थित होते.

सलग तीन वर्षांपासून होणाऱ्या या उपक्रमाचं, पो. नि. बाळासाहेब खाडे यांनी कौतुक केेलं. सेवाभावी संस्थानी सामाजिक बांधिलकीतून सातत्याने असे उपक्रम घेणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजाला एक नवा आदर्श मिळतो. जेसीआय वणी सिटीची टीम ही नव्या दमाची तरुणाई आहे. त्यांनी असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशा सदिच्छा खाडे त्यांनी यावेळी व्यक्त केल्यात.

दिवाळी म्हटलं की, अनेकजण नवनवीन कपडे घेतात. मात्र असे अनेक उपेक्षित आहेत, ज्यांना अंगभरदेखील कपडे मिळत नाहीत. आपण वापरून झालेले कपडे फेकतो किंवा त्यावर भांडी विकत घेतो. घरातले अनेक कपडे, ब्लँकेट, थंडीचे कपडे कधीच वापरण्यात येत नाहीत. त्याची विल्हेवाट लावणंदेखील अवघड जातं. हे सगळे कपडे कुणा गरजूंच्या कामी यावेत म्हणून गेल्या सलग तीन वर्षांपासून जेसीआय वणी सिटी हा उपक्रम राबवीत आहे.

जेसीआय वणी सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी याही वर्षी 24 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांकडून कपड्यांचं संकलन केलं. स्थानिक प्रज्योत ज्वेलर्स, स्वामी समर्थ कम्प्युटर अॅण्ड प्रिंटर्स, बाजोरिया लॉन्स, हॉटेल रसोई इथे त्यांनी संकलन शक्य नव्हतं, अशांकडून त्यांनी घरून कपडे कलेक्ट केलेत.

वणी बहुगुणीशी बोलताना सुमित चोरडिया म्हणाले की, सर्वच धर्मात मानवसेवा ही श्रेष्ठ सांगितली आहे. आपल्याकडे जे अधिक आहे, ते आपण इतरांना, विशेषतः गरजुंना दिलंच पाहिजे. हे कपडे देताना आपण आपल्या परिवारातीलच सदस्यांना देत आहोत अशी भावना ठेवून चांगल्या कंडिशनमधले कपडे व वस्तू देण्याचे नागरिकांना आवाहन केले होते.

नागरिकांनी या मानवतावादी उपक्रमाला दाद देत जवळपास 2000 कपडे व वस्तू दान दिल्यात. आम्ही या प्रकल्पाचे नाव ‘‘मुस्कान’’ असे ठेवले आहे. मुस्कान म्हणजे स्मित. एखाद्या गरजवंताची गरज पूर्ण झाल्यावर हे स्मित येतं, त्यातच वैश्विक ईश्वराचा वास असतो, असे सुमित यावेळी म्हणाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.