विलास ताजने, मेंढोली : राज्य शासनाच्या दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाने ( गृह विभागाने ) ३ नोव्हेंबरला एक अधिसूचना काढून देशी दारूची दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ८ वाजताची केली आहे. परिणामी चहा ऐवजी दारु ढोसणाऱ्यांचा झिंगाट आता रामप्रहरानंतर लगेचच पहायला मिळणार आहे.
दारूच्या व्यसनामुळे अपघात, खून, भांडणे होतात. अनेक घरातील पुरुष दारूच्या आहारी गेलेली असतात. गरिबी आणि कुपोषणाच्या दुःखात दारूमुळे प्रचंड भर पडते. बराचसा पैसा या व्यसनात खर्च होतो. दारूबंदी चळवळीचा संबंध महात्मा गांधी पासूनच आहे. गांधीजींनी दारूबंदी अनिवार्य मानली.त्यासाठी सत्याग्रह केले. म्हणून स्वातंत्र्यानंतर लाक्षणिकरित्या गुजरातमध्ये दारूबंदी झाली. महाराष्ट्र शासनाने वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. परंतु सदर जिल्ह्यात दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्या २००७ च्या अधिसूचनेनुसार पूर्वी देशी दारू दुकान उघडण्याची वेळ सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत होती. मात्र आता त्यामध्ये पुन्हा वेळ वाढवून दिली आहे. महामार्गावरील बंद झालेली दारू दुकाने पुन्हा सुरू होणे. अवैध दारू विक्रीला मिळणारे पडद्यामागील पाठबळ पाहता एक प्रकारे शासन प्रशासनाला गावागावात शांतते ऐवजी झिंगाट पाहणे आवडते की काय, असे वाटणे स्वाभाविक आहे.