काँग्रेस सेवादलाच्या पदयात्रेचा शिंदोला येथे समारोप
पदयात्रेला शेतकरी, शेतमजूर, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विलास ताजने, मेंढोली: शासनाने काही निवडक तालुके दुष्काळग्रस्त किंवा दुष्काळ सदृश घोषित केले. मात्र वणी उपविभागात सर्वत्र खरिप हंगामाची परिस्थिती गंभीर असतांना वणी आणि झरी तालुक्यांना वगळण्यात आले. म्हणून दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूरांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी यवतमाळ काँग्रेस सेवादलाच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर पदयात्रेचा समारोपीय कार्यक्रम शिंदोला येथे दि.१९ सोमवारी सायंकाळी पार पडला.
सदर पदयात्रेला पंडित नेहरू यांच्या जयंती दिनी झरी तालुक्यातील टाकळी येथून प्रारंभ झाला. मुकुटबन, कायर, वणी, शिरपूर, शिंदोला असा १२८ कि.मी.चा पायदळ प्रवास करीत ही पदयात्रा वणी तालुक्यातील टाकळी येथे इंदिरा गांधींच्या जन्मदिनी पोहचली. पदयात्रेत शेतकरी, शेतमजूर, युवकांचा भरभरून सहभाग होता. पदयात्रे दरम्यान गावागावांत सभा आयोजित करून शासनाचे शेतकरी विरोधी धोरण, वाढती महागाई, बेरोजगारी आदी प्रश्नांवर जनसामान्यांत जाणीव जागृती करण्यात आली.
पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर पदयात्रेचे आयोजन केले होते. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे माजी खासदार नरेशजी पुगलिया, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार विजयाताई धोटे, माजी आमदार वामनराव कासावर होते. मंचावर देविदास काळे, राजू कासावार, मोरेश्वर पावडे, पुरुषोत्तम आवारी, अरुणा खंडाळकर, शकुंतला गिरी आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी व्यासपीठावरील उपस्थितांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. झरी तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या सामूहिक नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रास्तविक विवेक मांडवकर, संचालन वैद्य गुरुजी यांनी केले. आभार अरुण चटप यांनी मानले. काँगेसचे कार्यकर्ते मुरलीधर ठाकरे, धनराज सातपुते यांनी समारोपीय कार्यक्रमाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर, तरुणांची उपस्थिती होती.