इयत्ता दहावीच्या बहुसंची प्रश्नपत्रिका बाद

इंग्रजी, गणित विषयासाठी मिळणार एकच प्रश्नपत्रिका

0

विलास ताजने, वणी: माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीच्या इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी बहुसंची (A B C D )अशा चार संच प्रश्नपत्रिका पद्धती ऑक्टोबर २००४ च्या परीक्षेपासून सुरू करण्यात आली होती. मात्र बालभारतीने कळविल्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१७ -१८ मध्ये इयत्ता ९ वी आणि २०१८-१९ पासून इयत्ता दहावीच्या पुनर्रचित पाठयपुस्तकाची निर्मिती महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभासक्रम संशोधन मंडळामार्फत करण्यात आलेली आहे.

त्याअनुषंगाने इयत्ता दहावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून करण्यात आलेली आहे. सदर नवीन अभ्यासक्रमाची इयत्ता दहावीची प्रथम परीक्षा मार्च २०१९ मध्ये होणार आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट विषयांचे स्वरूप हे प्रामुख्याने कृतीकेंद्रित आहे. ज्ञानरचनावादावर आधारीत आशयाचा समावेश पाठयपुस्तकात करण्यात आलेला आहे.

त्यामुळे सद्यस्थितीत शालान्त परीक्षेसाठी संपादित होत असलेल्या कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिकांमध्ये आकलन, उपयोजन, रसग्रहण, अभिव्यक्ती विकास यावर आधारीत प्रश्नांचा समावेश आहे. मुक्ततोरी प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे मत व्यक्त करता येणार आहे. पाठांतराचा अवलंब करून उत्तरे देण्यास आता वाव राहणार नाही. पाठ्यपुस्तकाबाहेरील आव्हानात्मक प्रश्न असणार आहे.

म्हणून नवीन अभ्यासक्रमात इयत्ता दहावीच्या बहुसंची ऐवजी इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी एकच प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार आहे. मात्र पुनर्रपरीक्षार्थी विध्यार्थ्यांना अंतिम संधी प्रचलित पद्धतीप्रमाणेच ABCD अशा चार संचात राहील. विशेष म्हणजे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीत इंग्रजी विषयासाठी बसणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे ABCD अशा चार संचात प्रश्नपत्रिका राहील.

दि.२७ नोव्हेंबरला विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी सदर आशयाचे पत्र शाळांचे मुख्याध्यापक, केंद्र संचालक, पर्यवेक्षक, परिक्षक, नियामक यांच्या माहितीसाठी प्रकाशित केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.