आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची जंगलात भटकंती

आरोपीने हिसकावला एकाचा मोबाईल...

0

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील आरोपीला (दि.२६) सोमवारी रात्री अटक वारंट देऊन ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अनपेक्षित हल्ला झाला. या घटनेत पोलीस हवालदार राजेंद्र कुळमेथे यांचा मृत्यू झाला. तर पोलीस हवालदार मधुकर मुके आणि पोलीस शिपाई प्रमोद फुफरे जखमी झाले होते. घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला. आरोपी अनिल मेश्राम याला पकडण्यासाठी पोलिसांनी मारेगाव परिसरातील जंगलात शोध मोहीम हाती घेतली.

सदर शोध मोहिमेत वणी, मारेगाव, पांढरकवडा, मुकुटबन, शिरपूर आणि यवतमाळ पोलीस सहभागी झाले आहे. मात्र चार दिवस लोटूनही आरोपीचा ठावठिकाणा लागला नाही. आरोपीने मृतक पोलीस हवालदार राजेंद्र कुळमेथे यांचा मोबाईल पळवून नेल्याची माहिती आहे. त्याआधारे आरोपीचे ‘लोकेशन’ (स्थान) रोहपट, हिवरी लगतच्या जंगलात मिळाले.

दरम्यान आरोपी अनिल हा सांयकाळी सहा वाजताच्या सुमारास सुसरी पेंढरी परिसरात एका भाजी विक्रेत्याला दिसल्याची माहिती नुकतीच मिळाली असून त्याने एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून त्याचे सीम तोडले असल्याची चर्चा गावात सुरू आहे. या चर्चेला पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. अनेक सशस्त्र पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आरोपीचा शोध घेत आहे.

प्रसंगी स्वरक्षणार्थ आरोपीवर गोळी झाडण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव  यांनी दिल्याची माहिती आहे. तथापि सदर पोलीस खून प्रकरणा बाबत विधानसभेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याअनुषंगाने मारेगावचे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी मुंबई वारी केली. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या लढवित आहे.

“पोलिसांनी काढले वड्याचे तेल वांग्यावर”
रोहपटच्या जंगलातुन पुरुषोत्तम मेश्राम नावाचा गृहस्थ आपल्या शेतात कामावर जात असताना पोलिसांनी त्याला विनाचौकशी आरोपी अनिल आत्राम समजून बेदम मारहाण केली. मी अनिल नाही म्हणून तो सांगत होता. मात्र पोलीस ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. या मारहाणीत पुरुषोत्तमच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. एकीकडे डोळ्यात तेल घालून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे आरोपी केंव्हा सापडतो याची उत्सुकता जनसामान्यांत शिगेला पोहोचली आहे. तूर्तास मात्र आरोपीला शोधतांना पोलिसांचा पारा चढला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.