विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील पोलीस हवालदार खून प्रकरणातील आरोपी हाती न लागल्यामुळे अखेरीस वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी मंगळवार पासून शोध मोहीम थांबवली आहे. दि.२६ नोव्हेंबरला रात्री उशिरा पोलीस आरोपी अनिल मेश्रामला अटक वारंट बजावून ताब्यात घेण्यासाठी गेले होते. आरोपीला अटक करण्यासाठी गेलेले पोलीस आणि आरोपी यांच्यात बोलणे चालू असताना आरोपीने अचानक हल्ला चढवला. यात पोलीस हवालदार राजेंद्र कुळमेथे यांचा मृत्यू झाला. तर पोलीस हवालदार मधुकर मुके, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे जखमी झाले होते.
मृतक कुळमेथे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शोध मोहिम सुरू केली. यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील २०० च्यावर पोलीस सहभागी झाले होते. आरोपीला प्रसंगी ‘जिंदा या मुर्दा’ पकडण्याचे आदेश दिले होते. मात्र आरोपीला स्थानिक जंगलाचा पक्का अभ्यास असल्याने आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी अनिल मेश्राम समजून रामपूर येथील पुरुषोत्तम आत्रामला अकारण चोप दिला. त्यामुळे जखमी पुरुषोत्तमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मनसेने पुरुषोत्तमला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मारेगाव पोलीस ठाण्यावर आदिवासी बांधवाचा मोर्चा काढला. संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी केली. आठ दिवस होऊनही आरोपीचा सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी तूर्तास शोध मोहिम गुंडाळली. मात्र आरोपीचा शोध गुप्तपणे चालूच राहणार आहे. आरोपी हाती न लागल्यामुळे पोलीसांसह सामान्य लोकांचीही घोर निराशा झाली आहे. मात्र हिवरी ग्रामस्थ आरोपीच्या वागणुकीचे मनोरंजन किस्से सांगण्यात गुंग असल्याचे दिसून येत आहे.