शेतकऱ्यांनी बंद पाडले टॉवर लाईन उभारणीचे काम
विलास ताजने, वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात वरोरा करनुल ट्रान्समिशन कंपनीतर्फे विद्युत टॉवर लाईन उभारणीचे काम सुरू आहे. कंपनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन काम सुरू केले. काहींना थोडा मोबदला दिला. मात्र उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. परिणामी संतप्त शेतकऱ्यांनी जमिनीचे मोजमाप करून योग्य मोबदला जोपर्यंत निश्चित केल्या जात नाही. तोपर्यंत टॉवर उभारणीचे काम करू देणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी शिंदोल्याचे सरपंच विठ्ठल बोन्डे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
वणी तालुक्यातील शिंदोला, परमडोह, वेळाबाई, निळापूर, भालर, बेसा आदी गावातील शेतातून विद्युत टॉवर लाईन उभारणीच्या कामाला सुरुवात झाली होती. परंतु शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार मोबदला मिळाला नाही. जागृत शेतकऱ्यांनी कंपनीकडे मागणी केली. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तरी देखील टॉवर कंपनी अधिकारी पोलिसांना हाताशी धरून शेतकऱ्यांना धाक दाखवून काम सुरू करण्याचे प्रयत्न करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला आहे. म्हणून टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार अकृषक वाणिज्य दराने मोबदला आणि पीक नुकसान भरपाई देण्यात यावी.
त्यासाठी तालुका निरीक्षक भूमिअभिलेख विभागाने टॉवरच्या कामासाठी लागणाऱ्या जागेची मोजणी शासकीय पातळीवर करून शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला निश्चित करावा. अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते. विशेष म्हणजे सदर मागणीसाठी वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन अनेक आंदोलने केली. तथापि उपविभागीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी (दि. १२) बुधवारी शेतकऱ्यांची मते जाणून घेतली. मात्र तूर्तास कोणताही तोडगा निघाला नाही.
“शासन निर्णयात तरतूद”
टॉवर पायाभरणी फुटिंगचा मोबदला केंद्र शासन परिपत्रक २०१५ मधील ३.२ नुसार १०० टक्के देण्याबाबत तसेच ७६५ केव्ही ट्रान्समिशन लाईनच्या वायर कॉरिडॉरची मोजणी ही केंद्र शासन परिपत्रक २०१५ मधील १.३ नुसार ६७ मीटर व ८०० केव्ही साठी ६९ मीटरचा मोबदला आणि तारे खालील जमिनीचा मोबदला १० टक्के देण्याबाबत या संबंधीची सुधारणा शासन निर्णयात करून याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्याचे आश्वासन उर्जा मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरोराचे आमदार बाळू धानोरकर यांना दिले होते.
“वणी बहुगुणी”शी बोलताना सरपंच विठ्ठल बोन्डे म्हणाले की, शासनाने तालुका निरीक्षक भूमी अभिलेख विभागाद्वारे टॉवर व्याप्त जागेची, कॉरिडॉरची ( शेतातून जाणारा वायर मार्ग ) मोजणी करून मूल्यांकन निश्चित करावे. तसेच पीक नुकसान आणि झाडे यांचा मोबदला द्यावा. संबंधित नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी मोबदल्या संदर्भात कंपनीने करार करावा, अशी मागणी आहे. आमची मागणी रास्त आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही काम सुरू करू देणार नाही.”