यापुढे उन्हाळ्यातही टँकर चालणार नाही: अहीर
विवेक तोटेवार, वणी: वणीकरांची तहान भागविण्यासाठी वर्धा नदीवरील रांगणा भुरकी येथून पाईपलाईनद्वारे वणी नगर परिषदेने अथक प्रयत्नातून पाणी आणले. अगोदर पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणी पुरवठा करून वणीकरांची तहान भागविली जात होती. परंतु या वर्षी वणीकरांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. आता टँकरची उन्हाळ्यातही गरज भासणार नाही. असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे. वॉटर सप्लाय ऑफीस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वणी नगर परिषद, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व हंसराज अहीर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज वणीकरांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळणार आहे. मागील वर्षी वर्धा नदीवरील रांगणा भुरकी येथून पाणी आणण्याकरिता 15 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री यांनी उपलब्ध करून दिला. काम सुरू झाले. मात्र वाटेत अनेक अडचणीही आल्यात. उशिरा सुरू होणारा पावसाळा लवकर सुरू झाल्याने पाईपलाईन उखडली. परंतु नागरध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आता ही पाईपलाईन सुधारण्यात आली. या डिसेंबर महिन्यात अनेक चाचण्या घेतल्यानंतर हे पाणी वणीकरांना देण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये 11. 760 किमी अंतराची पाईपलाईन टाकण्यात आली. त्याचप्रमाणे 15 एच पी चे 5 पंप लावण्यात आलेत. शिवाय पाणी आणण्यासाठी 75 एचपीचे 3 पंप लावण्यात आलेत. त्याची क्षमता 2 लाख लिटर प्रति तास अशी आहे. याकरिता तीन मोटार लावण्यात आल्यात. दोन मोटर सुरू ठेऊन एक मोटार अतिरिक्त स्वरूपात ठेवण्यात आली. बिघाड झाल्यास काम थांबणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली असल्याची माहिती तारेंद्र बोर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सदर काम महाराष्ट्र जिल्हा प्राधिकरणाच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आले होते. 11.93 कोटी रूपयांचे काम पूर्ण झाले आहे. यापैकी 10 कोटी 50 लाख रुपयांचे बिल देण्यात आले आहे. उर्वरित रक्कम योजना पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहे. काम हे पूर्णपणे पारदर्शक असक्याची कबुली यावेळी नगरध्यक्षांनी दिली.
यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, मुख्याधिकारी संदीप बोरकर, विजय चोरडिया, विजय पिदूरकर, नगरसेवक व पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.