पोषण आहारातून पौष्टिक आहार बेपत्ता
विलास ताजने, वणी: शालेय विध्यार्थांचे आरोग्य सुदृढ राखण्याच्या उद्देशाने शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. त्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विध्यार्थांना दुपारचे जेवण देण्याची तरतुद केली आहे. त्याकरिता साप्ताहिक पोषण आहारा बरोबर आठवड्यातून एकदा पौष्टिक आहार निश्चित केला आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातून पौष्टिक आहार बेपत्ता झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येते.
साप्ताहिक वेळापत्रकाच्या अनुषंगाने सोमवार ते शनिवार तूरडाळ वरणभात, मटकी उसळभात, सांबार भात, हरभरा उसळभात, आमटीभात आणि मुगडाळ खिचडी याप्रमाणे सर्व शाळांमध्ये पोषण आहार देणे आवश्यक आहे. परंतु अनेक शाळांमध्ये वेळापत्रकाला बगल देत केवळ अन केवळ पिवळा भात दिल्या जात असल्याचे वास्तव आहे. शालेय पोषण आहारात बेचव अन्न मिळत असल्याने अनेक विद्यार्थी घरूनच दुपारचे जेवण आणणे पसंद करतात.
विशेष म्हणजे आठवड्यातून दर गुरुवारी पौष्टिक आहार म्हणून फळे, चिक्की, शेंगदाणे गुळ, बिस्किटे, बेदाणे, चुरमुरे, राजगिरा लाडू, मोड आलेली कडधान्ये यांसह महिन्यातून एकदा अंडी देण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्यांना सदर वेळापत्रकाप्रमाणे आहार मिळत नसल्याची वास्तविकता आहे. परिणामी या योजनेच्या मूळ उद्देशालाच हळताल फासल्या जात असल्याचे चित्र कमी अधिक प्रमाणात सर्वत्र दिसून येते.
विद्यार्थ्यांचा बीएमआय स्तर चिंतेची बाब
शालेय पोषण आहार योजनेत विद्यार्थ्यांचा ‘बीएमआय’ म्हणजे शरीर वस्तुमान निर्देशांक योग्य आहे की नाही हे तपासल्या जाते. कोणाच्याही शरीराचे वजन त्याच्या उंचीच्या तुलनेत बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी बॉडी मास इंडेक्स ठरविल्या जातो. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे तपासणी अंती केवळ २० ते २५ टक्केच विद्यार्थ्यांचा ‘बीएमआय’ स्तर योग्य वजन गटात आढळून येतो. बहुतांश विद्यार्थी कमी वजन गटात असल्याचे दिसून येते. यावरून विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा किती फायदा होतो, ही बाब संबंधित अधिकारी वर्गाला चिंतनाची आहे. अपेक्षित बीएमआय नसल्यास अनेक प्रकारच्या आजाराचा धोका संभवतो.
विशेष म्हणजे जीआरएम समिती मार्फत दि.३ ते १० डिसेंबर दरम्यान शालेय पोषण आहार योजनेच्या विविध बाबींचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित तपासणी अधिकाऱ्यांना सदर गंभीर बाब शाळेत लक्षात आली नाही. ही खेदाची तेवढीच संतापजनक बाब आहे
.