उत्पादन नव्हे उत्पन्न वाढवा ! ………घनश्याम आवारी
उत्पादन नव्हे उत्पन्न वाढवा !
घनश्याम आवारी
शेतकरी मित्रांनो, आज सर्व जगाचा पोशिंदा उपाश्या पोटी झोपतोय, हे सर्वांनाच माहिती आहे. जो कापूस पिकवतो त्याला घालायला कपडे नाही. जो धान्य पिकवतो त्याला खायला अन्न नाही. जो भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्याच्या खिशात दमडी नाही. हे सर्व कशामुळे याचा आज विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा एक दिवस असा येईल की, आपल्याला शेतीपासून दूर जावे लागेल. जर का हा दुर्दैवी दिवस उजाडला तर कुणालाही खायला अन्न मिळणार नाही हे निश्चितच.
शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही झटतोय हे दाखवणारे खूप आहेत. कुणी आंदोलन करतोय, कुणी कर्जमाफी मागतोय, कुणी मोर्चे काढतोय, पण खरंच यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परीस्थिती सुधारेल हे नक्कीच नाही. ही सर्व मंडळी फक्त आणि फक्त आपल्या राजकीय, सामाजिक तसेच आर्थिक फायद्यासाठी साध्याभोळ्या शेतकऱ्यांचा वापर करत आहेत. याहून दुसरे तिसरे काही नाही. कारण आजची परीस्थिती बघता शेतकऱ्यांना तात्पुरत्या नाही तर संपूर्ण समाधानाची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्याच्या दृष्टिकोणातून कार्य होणे महत्वाचे आहे. जे कार्य सुभाष पाळेकर, गोपिला अनुसंधान केंद्र देवलापार यांसारख्या व्यक्ती तसेच संस्था करीत आहेत.
आज जो तो शेतकऱ्यांना उपदेश देतोय की, उत्पादन जास्त घ्या म्हणजे तुम्हाला जास्त फायदा होईल. पण काय हे खरेच योग्य आहे. आज आपण शेतकरीसुध्दा या संकल्पनेला बळी पडलो आहोत. उत्पादन वाढविण्याच्या ध्यासाने वाटेल ती कीटकनाशके, वाटेल ते खत उपयोगात आणतोय, पण आपल्या परिस्थीतीत काही सुधारणा झाली नाही ना! का बरं नाही फायदा झाला आपल्याला या संकल्पनेचा कारण उत्पादन वाढविण्यासाठी जो जास्तीचा खर्च आपण करतोय तेवढंच उत्पादन होतय. म्हणजे वाटायला आपल्याला वाटतं की ज्या जागी 25 क्विंटल कापूस झाला पण निव्वळ नफा बघता आपल्या हातात काहीच उरत नाही. कारण आपण जो वाढीव खर्च केला तेवढाच वाढीव नफा झाला आणि उत्पादन जास्त झाल्यामुळे पिकांना भावसुध्दा कमी मिळाला.
आता तुमच्या मनाला वाटत असेल की हे सगळं तर ठिक आहे पण याला पर्यायी उपाययोजना कोणती. तर माझ्या मते शेतीवर अवाढव्य खर्च करण्याच्या भानगडीत पडायचेच नाही. जेवढ्या कमीत कमी पैशात शेती करता येईल तेवढी करायची. ती कशी करायची यासाठी सुभाश पाळेकरांचं तंत्रज्ञान वापरू शकतो. त्यामुळे लागवड खर्च कमी घेऊन उत्पन्न वाढेल. त्याच बरोबर उत्पादन कमी झालं तर बाजारात मालाची मागणी वाढेल आणि भाववाढ होईल (त्यामुळे कुणी उपाशी मरणार नाही फक्त जी निर्यात होत होती ती कमी होईल एवढेच) भाववाढ झाल्यानेसुध्दा आपले उत्पन्न वाढेल याचं उदा. बघायचं झाल्यास कांदा किंवा तुरीचं बघता येईल.
उत्पादन कमी झाल्यामुळे त्या मालाचे भाव गगनाला भिडाले होत हे आपण जाणतोच. असेच जर आपण बाकी बाबतीत करू शकलो तर नक्कीच सरकारला भाववाढ करून द्या म्हणण्याची पाळी आपल्यावर येणार नाही. आता तुम्ही म्हणाल की, हे सगळ ठिक आहे. आम्ही शेतीला आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करणार नाही पण तरीसुध्दा बाकीचे शेतकरी तर करणारच परिणामी उत्पादन वाढेल आणि आमचं नुकसान होईल. तर या प्रश्नाच्यासुध्दा मागे न लायगता आपण त्या पिकाचं उत्पादन घ्यायचं जे आपल्या भागात घेत नाही म्हणजे आपल्याला बाजारात स्पर्धा कमी असेल आणि भाव चांगला मिळेल आणि परिणामी उत्पन्न वाढेल उदाहरण घ्यायचं झाल्यास जर आपण सातत्याने सोयाबीन, तूर अथवा ज्वारीचं उत्पादन घेत असू तर आता त्यात बदल करून ऊसाच उत्पादन घ्यायचं.
आता आपल्या भागात ऊसाचं उत्पादन होत नसल्याने लोकल बाजारात ऊसाला चांगला भाव मिळेल आणि बाहेर जिल्ह्यातून ऊस जास्त भावात घेणे केव्हाही परवडेल म्हणजे लोकल बाजार अथवा व्यापारी कुठेही विकला तर फायदाच होणारतेव्हा एकदा विचार करा आणि उत्पादनापेक्षा उत्पन्न वाढवा-
घनश्याम आवारी
+91 98609 15024
साधनकरवाडी, वणी