तुझा बाप म्हणून सांगतो….

व्यवसायाने डेऩ्टिस्ट असलेले डॉ. आशीष पु. कोमरेड्डीवार यांचा लेख खास "बहुगुणी कट्ट्याच्या" वाचकांसाठी...

0

डॉ. आ. पु. कोमरेड्डीवार:  प्रिय बुबु, तुला मी आर्यवीर म्हणालो असतो; पण मित्रासोबत मी तुझा वडील आणि सल्लागारही आहे हे लक्षात आले. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी सुख अन् जबाबदारी एकत्र अनुभवतोय. मी परमेश्वराकडे कधीच सोप्या आयुष्याची मागणी केली नाही; पण काही प्रमाणात प्रयत्न व नशीब यांच्या जोरावर आयुष्यातील तणाव कमी करावा अशी प्रार्थना मात्र नक्की केली.

माझ्या आयुष्यात मला एक चांगला परिवार अन् वैचारिक बुद्धी मिळाली. तसेच्या तसे तुलाही मिळाले आहे, असे मला वाटते. मेहनत आणि बुद्धी यांना पर्याय नसतो. हे तू कायम आपल्या मनावर कोरून ठेव. पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे ‘ हे नेहमीच लागू पडते.

मी माझ्या आयुष्यात काही गोष्टी अनुभवांतुन तर काही गोष्टी दुसऱ्यांच्या अनुभवांतून निरीक्षण करुन शिकलो. आयुष्यात सहजासहजी खूप कमी गोष्टी मिळतात. त्यांनाही महत्त्व द्यायला शीक. तुझ्याकडे उपलब्ध असलेल्या सगळ्या गोष्टींचा चांगला उपयोग करुन घे. ‘आपल्याकडे काय आहे ‘ हे नेहमीच नसलेल्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचे असते.

शक्य तेवढ्या सरळ अन् सोप्या मार्गाने जा; पण लक्षात ठेव, तुला जर खरंच काही मोठे जाणीवपूर्वक मिळवायचे असेल तर काही मोठे अन् वेगळे प्रयत्न करायची मानसिक व शारीरिक तयारी ठेव. मार्ग सापडतील. नक्कीच सापडतील. जेव्हाही तुला त्रास अन् काळजी सतावत असेल, तेव्हा तू नक्कीच योग्य मार्गावर आहेस, हे लक्षात घे अन् तुझे प्रयत्न सुरूच ठेव.

त्रास, पीडा, दुःख हे आयुष्यातल्या मार्गावरचे न टळणारे थांबे आहेत. कधीही अतीव सुखाने हुरळून जाऊ नकोस किंवा खुपशा दुःखाने कोसळू नकोस. भावनांवर आवर ठेऊन मार्ग शोध. आजची वेळ निघून जाणार हे दोन्ही वेळेस ध्यानी असू दे. प्रेम, पैसा, सत्ता ह्या गोष्टींच्या मोहात अडकलास तर फक्त दुःख मिळेल. त्याचा स्वीकार कर. कुठल्याही नात्यातील प्रेमाची किंमत दुसऱ्या कशालाच येणार नाही हे जाणून घे.

खेळ, स्पर्धा, व्यायाम ह्या मानवाच्या आयुष्यात सामंजस्य आणण्यासाठी उपयोगी ठरतात. खुपदा आपण स्वतःच्या आयुष्यातून खूप काही शिकू शकतो. सगळ्यांना आयुष्यात सगळंच नाही मिळत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

सौंदर्य, आरोग्य आणि बौद्धिक क्षमता ह्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. तुझेही यांबद्दलचे आयाम वेगळे असतील, ते समजून घे. कधीही संकटांना व मेहनत घ्यायला घाबरु नकोस. चुका घडतील, त्यांतून शिकायला मिळेल. एकच चूक दुसरऱ्यांदा नाही करायची. हे चूक कळल्यावर सगळ्यांत आधी लक्षात घे.

आयुष्य हे योग्य पद्धतीने व नियोजनाने जगावे असे माझे मत आहे. तुझे तू ठरव. मी तुला संरक्षण नेहमीच नाही देऊ शकणार. तुझे विचार अन् तुझे संस्कार हेच तुझे मूलाधार आहेत. आयुष्यात मजा करायलाच हवी. सहली कर. मित्रांमध्ये व खेळांमध्ये रम. पण, छोट्या चुकांमुळे अख्ख्या आयुष्याची राखरांगोळी होते हेही लक्षात ठेव. मी तुला जन्म दिला. तुझ्या आवश्यक त्या गरजा पुरवणे माझे कर्तव्य समजतो. पण, तु स्वावलंबी बनावे, नाव अन् रुतबा कमवावा ही माझी इच्छा.

खुपसे लोक जगतात तसे काडीमुंग्यांसारखे आयुष्य काढू नकोस, हा सल्ला. जगात बोध घेऊन शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. वाचन आणि छंद ह्या आल्हाददायक गोष्टी आहेत. वेळ अन् पैसा कधीच फुकट दवडू नकोस. त्यांचा सन्मान करायला शीक. माणूस हा समाजशील प्राणी आहे.

खूप चांगल्या बोलण्याने मने जिंकता येतात. जिभेने जग वळवणाऱ्या नेत्यांकडून हे शिकण्यासारखे आहे. चांगला वक्ता होण्यासाठी, चांगला श्रोता असणे प्राथमिक आहे. जगात काही खोट्या म्हणी आहेत. प्रेमात अन् युद्धात चुकीच्या पद्धतीने जिंकणारा हा सगळ्यांत मोठा कमनशीबी असतो. शक्य तेवढे नियोजन करशील तर भविष्यातला मनस्ताप टाळता येईल.

भूत अन् भविष्य दोन्ही महत्वाचे आहेत; पण त्यांना जोडणारा वर्तमान हा सगळ्यांत मोठा बलवान आहे. शक्तीशाली आहे. वर्तमानातल्या संधी कधीच गमावू नकोस. माणसाला खुपश्या गोष्टी मुक्या जनावरांकडूनही शिकता येतात. कला, साहित्य, कर्म अन् व्यवसाय या गोष्टींतला अनुभव जवळून बघ. त्यांतल्या अनुभवांचा रस चाख.

जगात देव-दानव आहेत की नाही, माहीत नाही. मला ते दोन्हीही माणसांतच बघायला मिळतात. पण, जग चालवणारी एक चिरंजीव शक्ती आहे. वेगवेगळ्या रूपांमधून ती तुला रोज, क्षणोक्षणी भेटत राहील. त्याच्या अस्तित्वाची जाणीव करुन देईल. त्यावर अतोनात विश्वास ठेव. आपल्या सवयींमधूनच आपली संस्कृती निर्माण झाली आहे.

रोज न चुकता त्या चिरंजीव शक्तीला धन्यवाद द्यायला विसरू नकोस. जाती-धर्म अन् देशभक्ती या आयुष्यालाच पुरल्यात. क्रोध अन् कपट या मनुष्याला अपंग बनवतात. त्यांचा कायमस्वरूपी त्याग कर. दुसऱ्यांसाठी जगता-जगता स्वतःचाही विचार कर; पण नक्कीच संपूर्ण-स्वार्थी होऊ नकोस.

कधी कोणी तुला उपेक्षिताची वागणूक दिली तर त्याला तुझ्यातल्या जिवंतपणाची जाणीव करुन दे. तुझ्या वयापेक्षा तू नक्कीच समजदार म्हणून मोठा होशील हे मी तुझ्या बाळसवयींपासूनच हेरलंय. मला चुकीचा नको ठरु देऊस.

तुझी आई माझा विश्वास आहे. तसाच तुही माझा फक्त उत्तराधिकारीच नाहीस तर माझं काळीज आहेस. काही कारणास्तव आपल्यांत मतभेद झालेच तर मी त्यावेळी दिलेल्या सल्ल्याचा एकदा नक्कीच विचार करशील. बिबा ( तुझी आई, प्राची ) ही संवेदनशील आहे; पण तिच्या भावनांवर तिचे उत्तम नियंत्रण आहे. हे शिकून घे. भावनिक व्यक्ती कलाकार बनतो; पण आयुष्य जगण्याच्या कलेला थोडं दुःख देतो. तू सगळं जग फिरावस, निरनिराळ्या प्रांतातल्या संस्कृती जवळून बघाव्यात असे मला वाटते.

शरीर अन् मन हे आपल्याला लाभलेले दैवी साधन आहे. ते कायम नावीण्य निर्माण करतात. त्यांना सांभाळ. कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो, हा शेवटचा सल्ला. तुझं आयुष्य जरी तुझं असलं तरी ती आपल्या परीवाराची देण आहे हे ध्यानी असू दे. तू खूप मोठा हो, जग जिंक अन् समाधानी रहा. आशीर्वाद.

तुझे बाबा,
डॉ. आ. पु. कोमरेड्डीवार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.