बहुगुणीकट्टा: आजची कविता कान्होबा निब्रड ‘मृण्मय’ यांची
बहुगुणीकट्टामध्ये आज कान्होबा निब्रड ‘मृण्मय’ यांची समाजातील वास्तव मांडणारी कविता
खादाड सारे
गिधाड बसले मेलेल्यावर
लुचू लागले सर्व,
क्षणांत आली घार एकटी
उतरून गेला गर्व ।।१।।
कावळे आले, वेचू लागले
जित्या फुगल्या अळ्या,
खाऊन खाऊन पोट फुगले
भरल्या त्यांच्या नळ्या ।।२।।
कुठून तरी लांडगे आले
धूड उचलून नेले,
ओढत ओढत सांगाड्याचे
किती किती हाल केले ? ।। ३।।
ऐतखाऊ चिता बिचारा
एक चढला झाडावरी,
कावळ्या बघ लागली
त्याची नजर गिधाडावरी ।।४।।
खोकडाने ते हाडुक नेले
उचलून तोंडामधी,
दाढी वाढल्या बोकडा तुझी
निघेल स्वारी कधी ? ।।५।।
रेहेकत ते भेकर आले
हरिणे लागली पळू,
गाढवाचे रे खेचर होते
रानगव्यांना आले कळू ।।६।।
उकिरड्यावर मस्त बैसले
राख लावून अंगा,
कुत्र्या – लांडग्या भूक लागली
म्हणून चालला दंगा ।।७।।
चोच काढून गिधाड हसले
सांगू लागले कथा,
खोकून खोकून हाल झाले
अशी त्याची व्यथा ।।८।।
एकाने तर डफ घेतला
बांधून होता फेटा,
वाघ आला म्हणून सर्व
घालू लागले खेटा ।।९।।
झाडावरला चिता बिचारा
निघून गेला दूर,
बघून सारे नवीन वारे
घारीच्या डोळा पूर ।।१०।।
कवी – कान्होबा निब्रड ‘ मृण्मय ‘
शिंदोला ता. वणी जिल्हा यवतमाळ
++++++++++++++++
वणी बहुगुणी या न्यूज पोर्टलसाठी आर्टिकल, कविता पाठवण्यासाठी, तसंच तुमच्यात असणा-या कलागुणांविषयी माहिती देण्यासाठी
संपर्क : निकेश: 9096133400
Email id: [email protected]