वसंतराव नाईक एक ‘जननायक’

वसंतराव नाईक जयंती निमित्त डॉ. श्याम जाधव (नाईक) यांचा विशेष लेख

0
वसंतराव नाईक एक ‘जननायक
– डॉ. श्याम जाधव (नाईक)
महाराष्टाच्या केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक आणि अनेक क्षेत्रांमधे अत्यंत आदरानं आजही वसंतराव नाईक यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या अंतर्बाह्य जडणघडणीतून होणारं त्यांचं दर्शन हे आजही अनेकांना प्रेरणादायी ठरतं. त्यांनी केलेली शेतीतील क्रांती ही अद्भूत आहे. त्याची जागतिक स्तरावर दखल घेतली जाते. महाराष्टाच्या मुख्यमंत्रीपदावरून् त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय हे आजही चमत्कारिक वाटावेत असेच होते.
विकास आणि आधुनिकतेपासून दूर असा खूप मोठा बंजारा समाज यवतमाळ जिल्ह्यात आहे. पुसद तालुक्यात फुलसिंग नाईक व होनुबाई यांच्याच पोटी 1 जुलै 1913 रोजी गहुली येथे वसंतरावांचा जन्म झाला. पुढे उच्च शिक्षण, कर्तृत्व, सामाजिक बांधिलकी इत्यादींमुळे वसंतरावदेखील लोकांच्या मनातले ‘नाईक’ झालेत, हाही प्रवास मोठा खडतर आणि रंजक आहे.
वसंतरावांना शिक्षणात मोठी गोडी होती. पोहरादेवी, उमरी, भोजला, बान्सी या ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. शिक्षणसाठी ते कितीतरी मैल पायी प्रवास करत. आपल्या समाजातला हा अत्यंत प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत मुलगा काहीतरी नक्कीच मोठं काम करेन ही अपेक्षा समाजी वसंतरावांकडून करत होता.
शिक्षण घेताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. नागपूर विद्यापीठातून त्यांनी एल.एल.बी शिक्षण घेऊन कायद्याची पदवी मिळवली. महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी वाचनाची कास धरली. महात्मा जोतिबा फुले आणि अनेक सामाजिक क्रांतिकारकांच्या विचारांची पेरणी त्यांच्या मेंदूत होउ लागली. नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधे त्यांच्या संपर्कात अनेकजण आलेत. तिथून त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.
हजरजबाबीपणा, मुद्देसूद अभ्यासपूर्ण बोलणे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांचं वक्तृत्व हे अत्यंत प्रभावी होतं. त्यांच्या आयुष्यात अनेक महामानव प्रत्यक्ष आलेत. त्यातीलच एक डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. पुढे त्यांनी पुसद येथे आपला स्वतंत्र वकिली व्यवसाय सुरू केला. समाजात आपली एक स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. आपल्या वकिलीचा उपयोग त्यांनी निराधार, गोरगरीबांना, दीनदुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केला.
एक धडाडीचे समाज कार्यकर्ता म्हाणून वसंतराव नाईक यांची संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ख्याती पसरली. सन 1946 मध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. सन 1946 मध्ये् पुसद नगरपालिका निवडणुकीमध्ये् कॉंगेसच्या वतीने निवडणुक लढविली त्यात वसंतराव नाईक विजयी होवून त्यांची पुसद नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात कधीही मागे वळून पाहिलं नाही. आमदार, मंत्रिमंडळात महसूल मंत्री, कृषीमंत्री अशी जबाबदारी त्यांनी पार पाडली.
सन 1962 साली यशवंतराव चव्हाण हे भारताचे संरक्षणमंत्री झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रं दादासाहेब कन्नमवार यांच्या हाती आलीत. परंतु एक वर्षानंतर म्हणजे 1963 साली दादासाहेब कन्नमवार यांचे निधन झाले. नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला. सर्वांच्या डोळ्यांसमोर वसंतरावांचं नाव आलं. वसंतराव नाईक यांची बहुमताने मुख्यमंत्रीपदी निवड झाली.
महाराष्ट्राच्या इतिहासातील 1966 हे क्रांतिकारी साल राहिलं. याच वर्षी शेती उत्पादनाच्या नव्या कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांचा दौरा त्यांनी केला. सन 1966 साली अवर्षणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हिंमत देण्यासाठी राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांत झंझावती दौरा त्यांनी केला.
सन 1967 साली सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभावी प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरा केला. या निवडणुकीत विधानसभेवर पुसद मतदारसंघातून चौथ्यांदा निवड होऊन दि. 6 मार्च 1967 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दुसऱ्यांदा वसंतराव नाईक यांची एकमताने निवड झाली.
कृषी क्षेत्राविषयी अत्यंत आवड असल्यामुळे नाईक यांच्या प्रयत्नांमुळे 15 लाख टन धान्य अधिक उत्पादन वाढले. त्यातून दि. 19 एप्रिल 1969 साली पंजाबराव कृषी विद्यालयाची स्थापना करुन शेतकी व्यवसायात भर टाकण्यात मदत केली. 10 मे 1968 रोजी गुन्हेगारांना मुक्त जगता, यावे यासाठी पहिले खुले कारागृह पैठण येथे स्थापन केले व गुन्हेगारांना माणूस म्हणून जगण्यास मार्ग दाखविला. सन 1970 साली शहरी जीवनात वाढ व्हावी, गोरगरीब मध्य्मवर्गीयांना शहरात नोकरी करता यावी, म्हणून शासनातर्फे लोकांच्या मदतीला हातभार म्हणून 18 मार्च रोजी सिडकोची स्थापना केली. त्यातून लोकांना निवारा मिळाला.
सन 1972 ते 1973 साली राज्यात भीषण दुष्काळ होता. लोकांचे भुकेने बेहाल, जनावरांचा चारा या सारख्या गंभीर समस्या नाईक यांच्यासमोर आ-वासून उभ्या होत्या. मात्र त्या अडचणीवर त्यांनी मात करुन विविध कामे सुरु केली. मजुरदार लोकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली. विविध योजना राबवून जनतेला दिलासा दिला. 1977 साली वसंतराव नाईक यांनी वाशीम मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. वसंतराव नाईक केंद्रात जाऊनही जनतेला विश्वासात घेऊन विविध विकास कामे पार पाडली.

माझे वडील विजयराव नाईक हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सर्वकाही सुरळीत सुरू होतं. एकदा ते स्व. वसंतराव नाईक यांना नोकरीसंदर्भात भेटण्यासाठी गेले असता. त्यांनी माझ्या वडिलांना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून आणलेले बि-बियाणे दिले आणि सांगितले की ज्यांच्याकडे शेती आहे. त्यांनी फक्त शेती करावी व ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनीच फक्त नोकरी करावी असा सल्ला दिला. माझ्या वडिलांनी त्यांचा सल्ला हाच आदेश समजून लगेच मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला व व्यवसायासाठी शेती हा पर्याय निवडून पुढचा सर्व काळ सामजिक कार्यासाठी वाहिला. चांगली सुरू असलेली नोकरी सोडणे हा खूप धाडसी निर्णय होता मात्र केवळ त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी तो निर्णय घेतला. यावरून सर्वसामान्यांना त्यांचा किती आधार वाटत असावा याची प्रचिती येते.
स्व. वसंतराव नाईक हे केवळ स्वतः नेतृत्व झाले नाहीत तर त्यांनी दुस-या फळीचे नवे नेतृ्त्व उभे केले. त्यांचा शब्द प्रमाण माणून दुस-या फळीतील कार्यकर्त्यांनी अखेर पर्यंत कार्य केले. यात वाशीम जिल्ह्यामधील फुलउमरीचे पद्मश्री रामसिंगजी भानावत, दलित मित्र बाबूसिंगजी राठोड (लोहगाव), उमरीचे सोनबाजी जाधव नाईक (माझे आजोबा) यांचे प्रामुख्याने नाव घेता येईल. या व्यक्तींनी ऑल इंडिया बंजारा फेडरेशनच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर लगच्या राज्यातही सामाजिक कार्य केले. याकाळी फक्त नाईक साहेबांचा आदेश आहे इतकंच ध्यानात ठेऊन या व्यक्तींनी महिनो महिने घरदार सोडून स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, शिक्षण, तंटामुक्ती, इत्यादी कार्य केले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या तीन कर्तबगार व्यक्तींच्या सहवासात माझ्यावर संस्कार झालेत.

माझा प्रत्यक्ष कधी स्व. वसंतराव नाईक यांच्याशी संबंध आला नसला तरी माझ्या जडणघडणीत मात्र त्यांचा मोठा वाटा होता. माझे उमरी येथील घर स्व. वसंतराव नाईक यांच्या विचारांचे आश्रम होते. संपूर्ण भारतामध्ये पोहरादेवी किंवा उमरी येथे दर्शनासाठी येणारे भाविकांच्या विचारांच्या आदन प्रदानाचे एक केंद्र म्हणून ही वास्तू होती. त्यामुळे माझ्यावर उच्च शिक्षण घेणे. केवळ शिक्षण घेऊन आपली नोकरी किंवा व्यवसाय न सांभाळता समाजाप्रती असलेलं देणं याची जाणीव असणे. हे केवळ स्व. वसंतराव नाईक किंवा स्व. सुधाकरराव नाईक यांच्या विचारांमुळे यांनी दाखवलेल्या मार्गामुळे शक्य झालं.
आज बंजारा समाजाला जी ओळख आहे त्याचा पाया स्व. वसंतराव नाईक यांनीच रचला होता. त्यांनी डोंगर कपारीत व रानोमाळ भटकणाऱ्या बंजारा समाजाला आधुनिक जगाची ओळख करुन दिली. समाज जागृतीचा पहिला अध्याय त्यांनी समाजाला दिला. त्‍यांचे हे विचार बंजारा समजापुरते मर्यादित न राहता प्रत्येक जाती, धर्म, विविध समाजात पोहचले आणि प्रत्येक ठिकाणी एक माणूस म्हणून पुढं यावं, हीच त्यांची इच्छा होती. अशा या एका जननायकास जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.