अपहरण व खंडणी प्रकरणातील 4 आरोपी जेरबंद

भास्कर राऊत, मारेगाव: करणवाडी जवळ डॉक्टरचे अपहरण व खंडणी वसुली प्रकरणी मारेगाव पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास या सर्व आरोपींना मारेगाव येथे आणण्यात आले. आरोपींचे नाव मोहम्मद अर्शद अब्दुला (30) रा. राजस्थान तर जाकीर खान हसनी (30), मुजाहीद खान इद्रीस (26), मुश्ताक खान प्रताप (24) सर्व रा. हातिया जि. मथूरा उत्तर प्रदेश असे आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

खंडणी वसूल करून लुटारू तेलंगणात पसार
13 मार्च रोजी डॉ. प्रभास हाजरा हे नवरगाव येथील त्यांचे क्लिनिक बंद करून दुचाकीने मारेगाव येथे घरी परतत असताना रात्री 8 वाजताच्या सुमारास त्यांचे करणवाडीजवळ चार लुटारुंनी अपहरण केले होते. डॉ. हाजरा यांना कारमध्ये बसवून लुटारूंनी त्यांच्या अंगावरचे दागिने व जवळ असलेले 24 हजार लुटले. तसेच त्यांना खंडणीची मागणी केली. डॉ. हाजरा यांनी मित्रांना कॉल करून पैसे मागवले होते. लुटारू कारने मारेगाव वरून वणीत आले. वणीतील शेवाळकर परिसर येथे 3 लाख रुपये घेऊन लुटारू डॉक्टरला घेऊन कारने मारेगावच्या दिशेने गेले. डॉ. हाजरा यांना निंबाळा फाट्याजवळ सोडून सर्व लुटारू यवतमाळ रोडला पसार झाले.

अदिलाबाद जिल्ह्यात आणखी एक अपहरण व लूट
घटनेनंतर डॉ. हाजरा यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश पुरी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत इतर पोलीस ठाण्याला आरोपींचे वर्णन सांगून याबाबत माहिती दिली. तसेच लुटारू तेलंगणात पळून जाण्याची शक्यता ओळखून त्यांना देखील याबाबत सतर्क केले. दरम्यान अदिलाबाद जिल्ह्यातील इचोड येथे या लुटारूंनी लुटण्याच्या उद्देशाने एका कंटेनर चालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस अदिलाबाद पोलीस आधीच सतर्क असल्याने लुटारुंचा डाव फसला. ही लुट होत असताना एक लुटारू ताब्यात आला तर इतर पळून जाण्यात यशस्वी झाले.

मोडस ऑपरेंडी सारखीच
मारेगाव आणि इचोड येथील दोन्ही घटनांची मोडस ऑपरेंडी (कार्यप्रणाली) सारखी असल्याचे आढळून आले. तेलंगणा पोलिसांनी एका आरोपीकडून इतर आरोपींची माहिती काढली व त्यांना त्यांच्या गावी जाऊन अटक केली. सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतर या लुटारुंना मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शनिवारी दुपारी 11 वाजताच्या सुमारास सर्व आरोपींना मारेगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्व आरोपींना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र या टोळीच्या मुसक्या आवळल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर या टोळीने आणखी किती लोकांना लुटले याचा तपास सध्या सुरू आहे.

Comments are closed.