मनसे नेते राजू उंबरकर यांचे वणीत जंगी स्वागत

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची पक्ष नेते पदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदा विदर्भात आगमन झाले. शनिवारी दुपारी 3 वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी नागपूर विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान त्यांनी नागपूर विभागातील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

राजू उंबरकर यांनी दुपारी 4 वाजता ताफ्यासह नागपूरहून वणीकडे प्रस्थान केले. या मार्गावर बुटीबोरी, टेमुर्डा आणि वरोरा येथे मनसे कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून व पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. सायंकाळी 7.30 वाजता राजू उंबरकर यांचे वणीत आगमन झाले. यावेळी वणी विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकावर ढोलताशे व फटाके वाजवून राजू उंबरकर यांचे जंगी स्वागत केले. राजु उंबरकर यांच्या स्वागतासाठी शहरात मोठे मोठे बॅनर व रस्त्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे लावण्यात आले आहे.

मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेले मनसे कार्यकर्त्यांना मंचावरून मार्गदर्शन करण्याची संधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राजू उंबरकर यांना दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात राजू उंबरकर यांची मनसेच्या नेतेपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. राजू उंबरकर यांची मनसे नेतेपदी निवड झाल्यानंतर स्थानिक मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. वणी विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वाढता ग्राफ आणि पक्षाच्या बाजूने एकनिष्ठता लक्षात घेता राजू उंबरकर यांना पक्ष नेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नेते पदावर निवड झाल्यानंतर विदर्भातील सर्व जिल्ह्यांची जवाबदारी राजू उंबरकर यांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे राजू उंबरकर हे वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय पक्षाचे पक्षनेते पद भूषविणारे एकमेव राजकीय व्यक्तीमत्व आहे.

Comments are closed.