बँकेच्या खात्यातून केले एक लाख 23 हजार रूपये लंपास
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वांजरी येथील इसमाच्या वणीतील बँक खात्यातून 1 लाख 23 हजार रुपये लंपास झालेत. याबाबत माहिती होताच संबंधित इसमाने वणी पोलीस ठाणे गाठून रविवारी दुपारी तक्रार दिली आहे.
वांजरी येथील रहिवासी असलेले देविदास रामकृष्ण कुंभारे 3 फेब्रुवारीला एकूण 45 हजार रुपये आपल्या खात्यातून एटीएममधून काढले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पैसे काढावयास गेल्यानंतर समजले की त्यांच्या खात्यात फक्त 193 रुपये शिल्लक उरले आहे. जे यापेक्षा अधिक असावयास हवे होते.
त्यांनी बँकेत जाऊन माहिती घेतली असता त्यांनी काढलेले पैसे बरोबर दाखवत होते. परंतु2 फेब्रुवारीला 55 हजार व 3 फेब्रुवारीला 68 हजार 500 रुपये असे एकूण 1 लाख 23 हजार पाचशे रुपये काढण्यात आल्याचे समजले.
माहिती काढली असता सदर रक्कम वैजनाथधाम कोर्ट रोड देवधर जिल्हा देवधर राज्य झारखंड येथून काढण्यात आली होती. याबाबत या ठिकाणचे बँकेचे शाखा प्रबंधक यांच्याकडूनही माहिती काढण्यात आली. परंतु याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. देविदास यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी 17 फेब्रुवारीला वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.
यावरून आपले बँकेत असलेले पैसेही किती सुरक्षित आहे याबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. देविदास यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 420 नुसार फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.