8 वीत शिकणा-या मुलीला 38 वर्षांच्या आतेभावाने फूस लावून पळवले

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन शाळकरी मुलीला तिच्याच आतेभावाने फूस लावून पळवून नेले. वणी तालुक्यातील एका गावात मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे मुलाचा आतेभाऊ हा मुलीपेक्षा दुपटीपेक्षा अधिक वयाने मोठा आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे.

मुलगी (14) ही वणी तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती 8 व्या वर्गात शिकते. मुलीच्या वडिलांचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मुलीच्या घरा शेजारीच मुलीचे मामा राहते. सध्या मुलीच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तिचा भाऊ व आई हे मामाच्या घरी झोपण्यासाठी जातात. सोमवारी दिनांक 13 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास मुलगी, आई व भाऊ नेहमी प्रमाणे मामाच्या घरी झोपण्यासाठी गेले.

पहाटे 4 वाजताच्या सुमारास मुलीच्या आईला जाग आली. तिने उठून पाहिले असता तिला त्यांची अल्पवयीन मुलगी आढळून आली नाही. मुलीची आई व कुटुबीयांनी शेजा-यांकडे याबाबत चौकशी केली. मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे त्यांना मुलगी घरून निघून गेल्याचा संशय आला.

मुलीचा आतेभाऊ (38) हा जवळच्याच गावात राहतो. तो नेहमी मुलीच्या घरी ये-जा करायचा. मंगळवारी दिनांक 14 मार्च रोजी म्हणजेच घटनेच्या संध्याकाळी मामेभावाच्या आईचा पीडितेच्या आईला फोन आला व तिने माझा मुलगा तुझ्या मुलीला घरी घेऊन आला, अशी माहिती दिली. त्यावर मुलीच्या आईने दोघांना थांबवून ठेवा आम्ही थोड्या वेळात गावी पोहोचतो, असे सांगितले.

काही वेळाने मुलीची आई तिच्या भाच्याच्या घरी पोहोचली. मात्र तोपर्यंत त्यांचा भाचा अल्पवयीन मुलीला घेऊन निघून गेला होता. 14 वर्षांच्या सज्ञान नसलेल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याने मुलीच्या आईने शिरपूर पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी  आतेभावा विरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Comments are closed.