भर रहदारीच्या रस्त्यात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डॉक्टरचे अपहरण

भास्कर राऊत, मारेगाव: दवाखाना बंद करून नवरगाव येथून मारेगाव येथे दुचाकीने परतणा-या एका डॉक्टरचे रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. रात्री 7.30 वाजताच्या सुमारास मारेगाव-नवरगाव रोडवरील नायरा पेट्रोल पम्प जवळ ही घटना घडली. या घटनेत अपहरणकर्त्यांनी वणीत 3 लाखांची खंडणी वसूल करीत डॉक्टरजवळ असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. प्रभास रविंद्रनाथ हाजरा (45) हे मारेगाव येथील मंगलम पार्क येथील रहिवासी आहे. नवरगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून ते वैद्यकीय सेवा देत आहे. मंगळवारी दिनांक 13 मार्च रोजी सकाळी प्रभास हे नेहमी प्रमाणे त्यांच्या ऍक्टीव्हा (MH29 BB2867) या दुचाकीने नवरगाव येथील दवाखान्यात गेले होते. संध्याकाळी दवाखाना बंद करून ते दुचाकीने मारेगाव येथील आपल्या घरी परतत होते. दरम्यान 7.30 वाजताच्या सुमारास करंजी-मारेगाव रोडवरील नायरा पेट्रोल पम्पवर एक पांढ-या रंगाची स्विफ्ट गाडी (MH31 **6307) त्यांच्या दुचाकीजवळ समोर आली. कार चालकाने दुचाकी समोर कार लावली.

कार समोर लावल्याने प्रभास यांनी दुचाकी थांबवली. दरम्यान गाडीतून 3 अनोळखी इसम खाली उतरले. त्यातील एकाने दुचाकी पकडली. तर दोघांनी त्यांच्या कानाजवळ रिव्हॉल्वर लावली. कारमध्ये एक इसम आधीच बसलेला होता. अपहरणकर्त्यांनी डॉक्टरला दुचाकी रस्त्याच्या कडेला लावण्यास सांगून कारमध्ये बसण्यास सागितेले. डॉक्टरचे अपहरण करून कार करंजीच्या दिशेने गेली.

कारमध्ये चौघांनी प्रभास यांना रिव्हॉल्वर व चाकूचा धाक धमकावून प्रभास यांच्या जवळील 24 हजार रुपये रोख रक्कम, 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, गळ्यातील 12 ग्रॅमची चैन हिसकावली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. करंजीनंतर अपहरणकर्त्यांनी कार वडकीच्या दिशेने वळवली व प्रभास यांना पैशाची तजवीज करण्यास सांगितले.

झालेल्या प्रकारामुळे हादरलेल्या प्रभास यांनी त्यांच्या सतीष नामक एका मित्राला कॉल लावला व त्याला वणीतील यवतमाळ रोडवर 3 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर अपहरणकर्ते वडकीहून कारने वणी येथील यवतमाळ रोडवरील साधनकर वाडी समोरील एका ऑटोमोबाईल दुकानासमोर आले. तिथे त्यांनी कार लावली. रात्री 9.30 ते 9.45 वाजताच्या दरम्यान प्रभास यांचा मित्र पैसे घेऊन आला. प्रभासने पैसे कारमधील व्यक्तीस देण्यास सांगितले. गाडीचा काच खाली करून अपहरणकत्यांनी पैसे घेतले व काही अंतरावर डॉक्टरला सोडून ते तिथून पसार झाले.

या अपहरणात लुटारुंनी सोन्याचे दागिने किंमत 45 हजार रुपये, जवळ असलेले 24 हजार रोख व 3 लाख असा एकूण 3 लाख 69 रुपयांचा मुद्देमाल लुटला. सर्व अपहरणकर्ते हे 28 ते 32 वयोगटातील आहे. घटनेनंतर प्रभास यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 4 अज्ञात आरोपींविरोधात भादंविच्या कलम 392, 363, 364 (अ) तसेच भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

हे देखील वाचा: 

शौचास गेलेल्या मुलीला फूस लावून पळवले, मुलीवर अत्याचार

दारु पिण्यास पैसे न दिल्याने काठीने बेदम मारहाण

Comments are closed.