राजू उंबरकर यांनी उचलली आकाशच्या उपचाराची जबाबदारी

जितेंद्र कोठारी, वणी: गरीब होतकरू असलेल्या आकाशच्या उपचारासाठी मदतीच्या आवाहनाला परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अवघ्या काही तासांमध्ये 60 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम अकाउंटमध्ये जमा झाली. विशेष म्हणजे ‘वणी बहुगुणी’च्या माध्यमातून आकाशबद्दल कळताच मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी उपचाराची संपूर्ण जबाबदारी उचलत तात्काळ 2 लाख दिले. सोबतच पुढे देखील जो काही खर्च लागेल ती करण्याची ग्वाही दिली. दरम्यान मदतीचा ओघ बघून आकाशच्या कुटुंबीयांनी मदत करणा-यांचे आभार व्यक्त करत, आवश्यक ती आर्थिक मदत झाल्याने मदत थांबवण्याचे आवाहन केले आहे.

आकाश विजय बागडे (21) हा वणीतील नांदेपेरा रोड, बँक कॉलोनी येथील रहिवासी आहे. तो एका गरीब कुटुंबातून येतो. त्याचे वडील हमाली करतात. तर आई दुस-यांच्या घरी स्वयंपाक करण्याचे काम करते. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून आकाश देखील एका ठिकाणी खासगी काम करतो. तीन-चार दिवसांआधी आकाशची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्याला वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वणीत उपचार शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्याला नागपूर येथे रेफर केले. नागपूर येथील डॉक्टरांनी त्याला 3 ते 4 लाखांचा खर्च सांगितला होता.

‘वणी बहुगुणी’च्या माध्यमातून आकाशची आई व बँक कॉलोनीतील नागरिकांनी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला वणी, मारेगाव व झरी तालुक्यातूनच नव्हे तर राज्याबाहेरीलही दानदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मंगळवार 28 मार्च रोजी बातमी प्रकाशित होताच अवघ्या काही तासांमध्ये तब्बल 60 हजार रुपये दानदात्यानी मुलाच्या कुटुंबियांच्या खात्यात पाठविले. 100 रुपयांपासून 5 हजारांपर्यंतची मदत लोकांनी ट्रान्सफर केली. यात गरीब, श्रीमंत सर्वांचाच समावेश आहे. अनेक सर्वसाधारण शेतकरी, शेतमजूर यांनी देखील आपल्या ऐपतीप्रमाणे मदत पाठवली हे विशेष !

राजू उंबरकर यांची 2 लाखांची मदत व पुढील उपचाराची जबाबदारी
मनसे नेते राजु उंबरकर यांना आकाश बाबत कळताच त्यांनी तात्काळ नागपूर येथील मनसे कार्यकर्त्यांना बागडे कुटुंबीयांची भेट घेऊन शक्य तेवढी मदत करण्याचे आदेश दिले. मंगळवारी सायंकाळी राजू उंबरकर यांनी मुलाच्या उपचारासाठी 2 लाख रुपये दिले. शिवाय आकाश बरा होत पर्यंतचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी उचलली. उंबरकर यांच्या मदतीनंतर आर्थिक मदतीचे आवाहन थांबवण्यात आले. सध्या आकाशवर नागपूर येथे उपचार सुरू झाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर नेहमी गरीब, पिडीतांच्या मदतीला धावून जातात. वणी उपविभागातील शेकडो नागरिकांना याचा वेळोवेळी अनुभव आला आहे. या घटनेतही राजू उंबरकर यांनी माहिती मिळताच मदतीसाठी धाव घेतली. राजू उंबरकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आकाशवर आता उपचार सुरू झाले आहे. राजू उंबरकर यांच्या मदतीमुळे परिसरात कौतुक केले जात आहे. 

Comments are closed.