सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा ८०० वा अवतारदिन गुरुवारी
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व पेरीत केला अनेकांचा उद्धार
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: ‘कुमरू जियाला, कुमरू जियाला’ या चर्चेने सर्वत्र आनंदाचे वातारवण झाले. भडोचचे राजकुमार हरपाळदेव पुन्हा जिवंत झाले होते. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध द्वितियेचा. हे हरपाळदेव पुढे गुजराथहून तीर्थयात्रेच्या निमित्ताने रामटेककडे निघतात. वाटेत ते अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे येतात. येथे त्यांची भेट श्री गोविंदप्रभू यांच्यासोबत होते. ‘चक्रधर’ या नावाने श्रीप्रभू हरपाळदेवांना संबोधतात. तिथूनच हरपाळदेव चक्रधर होतात. सर्वज्ञ चक्रधर स्वामी होतात. गुरुवारी त्यांचा अवतारदिन साजरा होत आहे. हे त्यांच्या अवताराचं ८००वं वर्ष आहे.
म्हाईमभटांच्या हातून सन 1278 मध्ये लीळाचरित्र लिहून पूर्ण झाले. हे सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या विविध लीळांचे स्मरण आहे. हे जणू त्यांचं चरित्रच आहे. गुजराथेतून महाराष्ट्रात आल्यावरही सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी आपलं नाव कुणाला सांगितलं नव्हतं. स्वतःचा परिचय दिला नव्हता. नगीनदेव, मौन्यदेव अशाच नावांनी ते ओळखले जायचे. पुढच्या काळात तर त्यांना चांगदेव राऊळ हे नाव लोकांनी दिले.
गुजराथच्या भडोच येथे त्यांचा जन्म झाला. माल्हनदेवी आणि विशालदेव हे त्यांचे आईवडील. कमलाईसा या त्यांच्या पत्नी. हरपाळदेवांना एका घटनेनंतर नवा जन्म मिळाला होता. ते पंचकृष्णावतारातले एक झालेत. श्रीकृष्ण, श्री दत्त, श्री चक्रपाणी, श्री गोविंदप्रभू आणि श्री चक्रधर स्वामी हे पंचकृष्ण आहेत. सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी विश्वाला परधर्म अर्थात महानुभाव पंथ दिला. अनेक जिवांचा उद्धार केला.
बाराव्या-तेराव्या शतकांत चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे प्राबल्य माजले होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही चार वर्णांची चौकट घट्ट होती. मानवी जगणं हे या वर्णव्यवस्थेने ग्रासलं होतं. भेदाभेद प्रचंड वाढला होता. या काळात सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी समतेची पेरणी केली. सामान्यजनांना कर्मकांड आणि अनिष्ट रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त केलं. सर्व जाती, धर्मातील लोकांत ते राहत. त्यांच्यासोबत खात-पीत. एवढंच नव्हे तर स्त्रियांनादेखील त्यांनी समानता प्रदान केली. त्यांच्याच प्रेरणेतून महदंबा ही स्त्रिकवयित्रीची प्रतिभा फुलली.
ईश्वर आणि जीव यांच्यातील द्वैत त्यांनी सर्वांना पटवून दिले. जगण्याचा मार्ग सोपा करणारं साधं तत्त्वज्ञान त्यांनी विश्वाला दिलं. संस्कृतच्या प्रभावाच्या काळातही त्यांनी मराठीचा आग्रह धरला. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा. ईश्वर. सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या लीळा ज्यांनी पाहिल्यात किंवा ऐकल्यात, त्यांना याचा प्रत्यय आला.
विविध पंथ आणि संप्रदायातील लोक त्यांना भेटलेत. सालबर्डी येथे अचलपूरच्या राज्याची कन्या आणि गोरक्षनाथांची शिष्या मुक्ताबाई यांची भेट झाली. पयोव्रती महंत नागुबाईसा, वामदेव अशी अनेक मंडळी सर्वज्ञ चक्रधर स्वामींमुळे प्रभावीत झालीत.
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर ही महानुभावांची काशी समजली जाते. महंत देमेराजबाबा उपाख्य दीपकराजदादा बिडकर म्हणतात की, सर्वज्ञ चक्रधर स्वामी रिद्धपूरला परमेश्वरपूर म्हणत. अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांची स्मृतिस्थळं आहेत.
त्यांच्या लीळांचं गुणगान आणि स्मरण संपूर्ण विश्वात होतं. पंजाब, राजस्थानपासून जगभरातले भक्त रिद्धपूर, पैठण, जाळीचा देव अशा ठिकाणी जातात. गुरुवारी त्यांचा अवतारदिन आहे. त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. दंडवत.