जल्लोषात पार पडले युवा संमेलन, कवितांनी वणीकर मंत्रमुग्ध

देश घडवण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावे: डॉ. संतोष डाखरे

विवेक तोटेवार, वणी: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची हास्यजत्रा झाली असून ही परिस्थिती बदलण्याची ताकद केवळ युवकांमध्ये असून त्यांनी महापुरुषांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी राजकारणात यावे असे आवाहन प्रा. डॉ. संतोष डाखरे यांनी केले. बुधवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी वणीतील शेतकरी मंदिराच्या सभागृहात युवा संमेलन रंगले यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. युवा संमेलनात झालेल्या सुप्रसिद्ध कवि अनंत राउत यांच्या कविता आणि किस्स्यांनी प्रेक्षक चांगलेच भारावून गेले. लढा संघटनेच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

संमेलनाची सुरूवात आकाश महादुळे यांच्या मिमिक्रीच्या कार्यक्रमाने झाली. यावेळी त्यांनी पशू-पक्षांचे आणि विविध अभिनेत्यांचे आवाज काढून संमेलनाची रंगतदार सुरुवात केली. त्यानंतर उद्घाटन समारंभ झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन रंगनाथ निधी अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय खाडे यांच्या हस्ते झाले. लढा संघटनेचे उपक्रम स्तुत्य असून यापुढेही असेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम लढानी घ्यावे, असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आशिष खुलसंगे यांनी लढा संघटनेच्या उपक्रमाला वेळोवेळी पाठिंबा दिला, यापुढेही विविध उपक्रमात त्यांच्या सोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उद्घाटनानंतर मुळचे मांगरुळ येथील असलेले व सुप्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय अभ्यासक प्रा. डॉ. संतोष डाखरे यांचे व्याख्यान झाले. सत्तेचा विचार हुकुमशाही निर्माण करतो. तर विचारांची सत्ता लोकशाही निर्माण करते. आपल्या देशातील 32 टक्के युवकांकडे राजकारणाची दिशा बदलवण्याची ताकद आहे. त्यामुळे युवकांनी राजकारणा बाबत सकारात्मक राहावे. राजकारण वाईट, केवळ धनिकांची मक्तेदारी आहे, अशी टिका टिप्पणी करण्यापेक्षा निवडणुकीच्या माध्यमातून युवकांनी राजकाऱणात यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कवितेने गाजवले सभागृह
कवि अनंत राऊत यांच्या कवितेने संपूर्ण सभागृह गाजवले. त्यांच्या कविता आणि कस्स्यांना वणीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘भोंगा वाजलाये, नेता गाजलाये’ या कवितेने प्रेक्षक चांगलेच भारावले तर ‘माफ कर बाई पण तुझ्यात पुरुष शोध न्हाई’ या कवितेने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. ‘थोर जिजामाते पोटी, राजा शिवाजी घडला’ या कवितेने श्रोत्यांची मनं जिंकली. यासह मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तुला चोरून पाहिन मी, बाप, शिवार या कवितांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली.

विद्यार्थी व विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार
कार्यक्रमात चालू वर्षात शासकीय सेवेत रुजू झालेल्या 55 युवक, युवतींचा सत्कार करण्यात आला. यासह वणी व परिसरातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचाही कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. शेखर वांढरे, कीरण दिकुंडवार, वैभव ठाकरे, प्रा. डॉ. दिपीप मालेकर, प्रवीण खंडाळकर, रुपेश पिंपळकर, सागर जाधव, विनोद आदे, अफरोज शेख, फुटबॉल ट्रेनर शहजाद, संदीप गोहोकार, गणेश आसुटकर, सोपान लाड, महेश डाहुले इत्यादींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून टिकाराम कोंगरे, संजय देरकर, डॉ. महेंद्र लोढा, शंकर दानव, संभाजी वाघमारे, डॉ. प्रा.दिलीप मालेकर, वैभव ठाकरे, अजय धोबे, सुधाकर चांदेकर, राहल खारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले तर प्रास्ताविक प्रवीण खानझोडे यांनी केले. उपस्थितांचे आभार ललित लांजेवार यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण खानझोडे, विकेश पानघाटे, अजय धोबे, अॅड. रुपेश ठाकरे, ललीत लांजेवार, राहुल झट्टे, शरद खोंड, राजु पिंपळकर, विवेक ठाकरे, प्रशांत काळे, सुभाष लसंते, इमाम्मूल हुसेन, अजय कवरासे, निलेश बुरबुरे, विलास कालेकर यांच्यासह लढा संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.