पुन्हा उडणार शंकरपटाचा धुरळा खैरगाव भेदी येथे 28 मार्चपासून

ह्या धमाल उत्सवात सहभागी होण्याची जय बजरंग मंडळाची विनंती

बहुगुणी डेस्क, मारेगाव: शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक वर्ष बंदी असलेला शंकरपट मागील वर्षापासून पुन्हा सुरू झाला. तालुक्यातील बोटोनीपासून दक्षिणेस 5 कि.मी. अंतरावरील खैरगाव भेदी येथे गुरुवार दिनांक 28 मार्चपासून शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे सामने 28, 29 आणि 30 मार्च दरम्यान चालतील. खैरगाव भेदीचे सरपंच तुळशीराम कुमरे यांच्या अध्यक्षतेखाली विजय चोरडिया कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी तुळशीराम पेंदोर, संजय काकडे, ग्रामसेवक जनबंधू, पोलीस पाटील माला कुमरे, नीड संस्थेचे अध्यक्ष गंगाधर आत्राम आदी मान्यवर उपस्थित राहतील.

शंकरपटात सहभागी होण्यासाठी प्रवेश फी 600 रुपये आहे. स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन यांच्यातर्फे विजय चोरडिया यांच्याकडून 1 लाख 2 हजार रुपयांची जंगी लयलूट होणार आहे. अ गटामध्ये प्रथम पारितोषिक 15,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 12,000 रुपये, तृतीय परितोषिक 9,000 रुपये, चौथे पारितोषिक 7,000 रुपये, पाचवे पारितोषिक 5,000 रुपये, सहावे पारितोषिक 3,000 रुपये आहे. 45 इंच मर्यादित ब गटामध्ये प्रथम बक्षीस 15,000 रुपये, द्वितीय बक्षीस 12,000 रुपये, तृतीय बक्षीस 9,000 रुपये, चतुर्थ बक्षीस 7,000 रुपये, पाचवे बक्षीस 5,000 रुपये आणि सहावे बक्षीस 3,000 रुपये राहील. यावेळी संजय काकडे यांच्याकडून होम थिएटरपासून विविध बक्षिसांची उधळण होणार आहे. विशेष सांगायचं झाल्यास गुरुवार दिनांक 21 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता सत्यपाल महाराजांचे शिष्य उदयपाल महाराज यांचा सप्तक खंजिरी वादनासह समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.

मारेगाव तालुका हा शेतकरी आत्महत्यांनी ग्रासलेला आहे. तो जगाचा पोशिंदा आहे. आज तो आर्थिक आणि मानसिक अस्वस्थता भोगत आहे. अशावेळी शंकरपट आणि शेतकऱ्यांच्या संबंधित उपक्रम राबवले तर त्यांना तेवढाच मानसिक दिलासा मिळेल. जगण्याची नवीन उमेद मिळेल. म्हणूनच शेतकरी आणि पशुपालकांना बळ देण्याकरिता या शंकरपटाला सगळ्यांनी यावं, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांनी केली आहे.

या शंकरपटाच्या आयोजनासाठी अध्यक्ष आनंद काकडे, उपाध्यक्ष दादाजी भोयर, सचिव घनश्याम बुराण, सहसचिव बालाजी रोगे, कोषाध्यक्ष कवडू मडावी, कार्याध्यक्ष मधुकर भोयर आणि निर्णय कमिटी कार्यरत आहे. सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहिती करता आपण श्रीकांत बुरान 9579896113, गजू रोगे 900765958, बाळू काकडे 950481616, संतोष मिलमिले 7499883008 या नंबरवर संपर्क साधू शकता.

Comments are closed.