विवेक तोटेवार, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या टिप्पणीचे वणीतही शनिवारी पदसाद उमटले होते. श्रीराम नवमी उत्सव समिती, वणी तर्फे रस्त्यावर उतरून निषेध करण्यात आला होता. दरम्यान शरद पवार यांना “जय श्रीराम” लिहिलेली तब्बल 1 हजार पोस्टकार्ड उत्सव समितीतर्फे पाठविण्याचा संकल्प करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात काही पोस्ट कार्ड प्रातिनिधिक स्वरुपात पाठवण्यात आले होत. मात्र आता 1 हजार पोस्टकार्ड पाठवण्यात आले अशी माहिती पंकज कासावार यांनी दिली.
येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या सोहळयाची तारीख जाहीर होताच शरद पवार यांनी राम मंदिर बांधल्याने करोना जाणार आहे का? देशाच्या प्रमुखांनी कशाला प्राधान्य दिलं पाहिजे? असा सवाल केला होता. त्यावरून भाजप आणि भाजपच्या मित्र परिवारातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. यात आता श्रीराम नवमी उत्सव समितीही उतरली आहे.
गेल्या आठवड्यात रवि बेलूरकर यांच्या नेतृत्वात श्रीराम नवमी उत्सव समितीचे कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी रस्त्यावर पवारांच्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी पत्रपेटीत शरद पवार यांच्या पत्त्यावर ‘जय श्रीराम’ लिहिलेले काही पत्र पाठवण्यात आले. यावेळी पंकज कासावार, सुरज निकुरे, रोशन मोहितकर, प्रितम भोगेकर, अक्षय मासेवर, अंकित राखुंडे, वैभव जयपूरकर, कार्तिक शिवरात्रीवार, सारंग पारखी इ. तरुण उपस्थित होते.