मटका धाड प्रकरणी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

33 आरोपी ताब्यात, मटका किंग फरार होण्यात यशस्वी

जितेंद्र कोठारी, वणी: येथील कुख्यात मटका किंग मिनाज शेख यांच्या घरासह 2 ठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्डयावर एलसीबीच्या पथकाने बुधवार 20 ऑक्टो. रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत 33 जणांना अटक करण्यात आली, तर मटका चालक मिनाज शेख फरार होण्यास यशस्वी झाला. या कार्यवाहीत पथकाने रोख, लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर व मोबाईल असे एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे धाडसत्राच्या या कारवाईबाबत एलसीबी पथकाने स्थानिक पोलीसांना सुगावा लागू दिला नाही. त्यामुळे पोलिसांच्या आशीर्वादानेच हा अवैध व्यवसाय सुरू होता की पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू होता याबाबत शहरात खमंग चर्चा रंगत आहे. वणीच्या इतिहासात ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. 

स्थानिक गुन्हा शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना वणी येथे हाय प्रोफाइल मटका जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीवरून सायबर सेलच्या मदतीने कार्यवाहीची व्यूहरचना तयार करण्यात आली. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत  किंचितही माहिती न देता 2 वाहनांमध्ये तब्बल 12 पोलीस अधिकारी व कर्मचारी बुधवारी सायंकाळी 5 वाजता यवतमाळहून वणीत पोहचले. साध्या ड्रेसमधील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित ठिकाणी फेरफटका मारून रेकी केली. खात्री पटल्यावर विराणी फंक्शन हॉल परिसरात डॉ सुराणा यांच्या घरासमोर मिनाज शेख यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे त्या घरी व त्याच परिसरात अख्तर पटेल यांचे घरी या पथकाने एकाच वेळी धाड टाकली.

मिनाज शेख यांच्या घरातून पोलिसांनी अतिक अहमद, विशाल पिसे, रोहित खैरे ज्ञानदेव बावणे, फारुक शेख, तरुण करपते, विशाल कोथळे, समीर टोंगे, सैय्यद सलाउद्दीन, सूरज सातपुते, सनी श्रेष्ठी, आकाश शेन्नूरवार, सुनील कामतवार, फैजान खान, मोहन काकडे शेख तबकीर, शेख युनूस, शेख साजिद, अब्दुल अल्ताफ, शेख इमरान, अनुवर्ष सातपुते, अनिल लोणारे, राजेश शिवरात्रवार, दिपक पचारे, आकाश पाटील यांना मटक्यावर उतराई करताना ताब्यात घेतले. तर मटका संचालक मिनाज ग्योसुद्दीन शेख हा पळून जाण्यास यशस्वी झाला.

अख्तर पटेल यांच्या घरात मटका जुगारवर खायवली करताना सूरज कारलेवार, परवेज शेख, संतोष तेजनकर, मुजबिर रहमान शेख, मोहम्मद अली, मनीष लांजेवार, कार्तिक संगमवार, संदीप काळे, विनोद ढेंगळे असे 9 आरोपी आढळून आले. दोन्ही ठिकाणाहून एलसीबी पथकाने रोख रक्कम, 89 मोबाईल हँडसेट, लॅपटॉप, प्रिंटर असे एकूण 9 लाख 92 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोनि अमोल पुरी व हे.का.उल्हास कुरकुटे यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींवर वणी पो.स्टे. येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4,5 तसेच 109,188, 269, 270 भादवी अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. फरार मटका संचालक मिनाज शेख यांचे शोध सुरु असून अटक करण्यात आलेले सर्व आरोपीना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

वणी पोलीस ठाण्याचे पितळ पडले उघडे
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी मटका, जुगार राजरोसपणे सुरु आहे. शहरात सिंधी कॉलोनी, एकता नगर, विराणी टॉकीज परिसर, जत्रा मैदान परिसरात दिवसभर मटका शौकिनांची गर्दी राहते. वणी पोलीस स्टेशन अंतर्गत राजूर (कॉलरी) या गावात तर देशासाठी बलिदान देणा-या एका शहीदाच्या नावाने असलेल्या चौकातच मटकापट्टी व्यवसाय सुरु आहे. एकीकडे सर्व काही आलबेल आहे असा दिखावा करताना दुसरीकडे मात्र वणी पोलीस ठाण्याअंतर्गत राजरोसपणे अवैध धंदे जोमात सुरु आहे. एलसीबी पथकाच्या या कार्यवाहीमुळे वणी पोलिसांचे पितळ तर उघडे पडले आहे शिवाय या कार्यवाहीबाबत कानोकान खबर लागू न दिल्याने अब्रुचे धिंदवडे देखील निघाले आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल पुरी, पोउपनी भगवान पायघन, सायबर सेलच्या दीपमाला भेंडे, सुमित पाळेकर, विशाल भगत, गजानन डोंगरे, सलमान शेख, किशोर झेंडेकर यांनी पार पडली.

हे देखील वाचा:

पती नव्हता घरी, संधी साधून केली बळजबरी

Comments are closed.