तालु्क्यात 10 रुपयांची नाणी घेण्यास दुकानदारांचा नकार, सर्वसामान्य त्रस्त
मारेगाव. झरी तालुक्यातही हिच परिस्थिती, चलनात असताना राष्ट्रीय मुद्राची अवमानना
जितेंद्र कोठारी, वणी: देशातील इतर मुद्राप्रमाणे 10 रुपयांची नाणी चलनात आहे. मात्र गैरसमज आणि वेगवेगळ्या अफवामुळे वणी शहर व ग्रामीण भागातून 10 रुपयांची नाणी हद्दपार झाली आहे. बाजारात सध्या दहा रुपयांचे नाणे घेण्यास भाजी विक्रेत्यांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत टाळाटाळ करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही पथसंस्थेमध्येही दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार दिला जातोय. त्यामुळे हे अधिकृत नाणे बंद झाले आहे का, असा गैरसमज वेगाने पसरत आहे. दरम्यान वणीतील लोकहीत फाउंडेशनने प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
दैनंदिन व्यवहारात दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणावर नाणे जमा होतात. परंतु दहा रूपयाचे नाणे ग्राहक घेत नसल्याने दुकानदार सुद्धा दहाचे नाणे नाकारत आहेत. एरव्ही त्यांना चिल्लर नाण्याची गरज असायची. मात्र बँकेत व व्यापारी सुद्धा घेत नसल्याने दुकानदारही दहाचे नाणे नकार देत आहेत. दहा रुपयांचे नाणे हे व्यवहारात असताना, या नाण्यांच्या बाबतीत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. तर चलनात असलेली राष्ट्रीय मुद्राची अवमानना होत असताना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या नाण्यांना आरबीआय चलनात आणत असते. त्यामुळं बाजारातील नाणी अधिकृत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय. त्याचबरोबर बँकांनाही नाणी घेऊन येणाऱ्या ग्राहकांना माघारी न पाठवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ग्राहकांकडून नोटांबरोबरच नाणी स्वीकारावीत असे रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय.
चलनात असलेले नाणे स्वीकारण्यास नकार दिल्यास गुन्हा दाखल
रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारने मान्यता दिलेली आणि सद्य चलनात असलेली मुद्रा स्वीकारण्यास व्यापारी किंवा बँक नकार देऊ शकत नाही. 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार देणाऱ्या व्यक्ती, व्यापारी किंवा बँकेविरुद्द कोणीही व्यक्ती भारतीय मुद्रा अवमानना अधिनियम कलम 124 -A अन्वये एफआयआर दाखल करू शकतात.