नागेश रायपुरे, मारेगाव: आज मारेगाव तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला. आज तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 6 रुग्ण आढळून आलेत. याआधी तालु्क्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 8 वर पोहचली आहे. एकाच दिवशी तालुक्यात कोरोनाने रुग्णांच्या बाबतीत सिक्सर लावल्याने तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
वणी येथे वास्तव्य करत असलेले मारेगाव शहरातील किराणा दुकान व्यावसायिक व त्याच्या संपर्कात आलेले 4 व्यक्ती आढळून आल्या आहेत. तसेच करणवाडी येथेही कोरोनाने शिरकाव केला असून तेथील 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आले आहेत.
मारेगाव तालुक्यात या कुंभा येथील एक व्यक्ती पॉजिटिव्ह निघाली होती. ती व्यक्ती निगेटिव्ह झाल्यानंतर गेल्या आठवड्यात शहरातील एक व सिंदी येथील एक असे दोन ऍक्टिव्ह रुग्ण झाले होते.
दोन जण बाधित आढळल्याने प्रशासनाने सिंदी येथील 69 जणांचे रॅपिड अँटीजन टेस्ट केली. यात ते सर्व निगेटिव्ह आले होते. त्यानंतर तालुक्यातील 41 जणांचे स्वॅब घेऊन यवतमाळ येथे तपासणी साठी पाठविण्यात आले होते.
यातील 35 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आलेत मात्र त्यातील सहा जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आलाा आहे. एकाच दिवशी 6 रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यातच आणखी 86 जणांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
पॉजिटीव्ह असलेले मारेगाव येथील प्रभाग क्रमांक सहा आणि करणवाडी येथील काही भाग सील करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. सदर व्यक्तींच्या संपर्कातील 20 जणांना ट्रेस करण्यात आले असून आणखी संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.