जब्बार चीनी, वणी: आज गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी तालुक्यात 4 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 323 झाली आहे. सध्या पोलीस, वाहतूक, वेकोलिनंतर कोर्ट, आरोग्य विभाग, महसूल विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वणीत जसजशी रुग्णसंख्या वाढत आहे. तसतसे कन्टेन्मेंट झोनची संख्या देखील वाढत आहे. मात्र कन्टेन्मेंट झोनवर सुरक्षा गार्डची कमतरता असल्याने अनेक कन्टेन्मेंट झोनमधल्या लोकांचा शहरात मुक्त संचार सुरू आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना कोरोनाबाबतची वणीकरांमध्ये असणारी ही बेजबाबदारी समोर आली आहे.
आज वणीत 24 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 20 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज आज 27 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. आज आरटीपीसीआर टेस्टचा एकही रिपोर्ट प्राप्त झाला नाही. अद्याप 244 संशयीत व्यक्तींचे रिपोर्ट यवतमाळहून येणे बाकी आहे. आज शास्त्रीनगर, रंगारीपुरा, वासेकर ले आऊट व पोलीस कॉटर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे.
सध्या तालुक्यात 323 पॉजिटिव्ह व्यक्ती आहेत. यातील 239 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 76 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. तर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची संख्या 4 झाली आहे.
आज 15 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 15 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या कोविड सेंटरला 43 व्यक्तींवर उपचार सुरू असून 30 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 14 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 75 व्यक्ती भरती आहेत.
कन्टेन्मेंट झोनबाहेर मुक्त संचार
दिवसेंदिवस कोरोनाचा शहरात उद्रेक होत असताना एकीकडे प्रशासन थकलेले असताना दुसरीकडे नागरिकांची बेजबाबदारी समोर येत आहे. लोक अद्यापही कन्टेन्मेंट झोन मधून बाहेर पडून कट्टा व गप्पांचे फड रंगवताना दिसत आहे. ग्रामीण भागात सुमारे 25 तर शहरी भागात सुमारे 50 कन्टेन्मेंट झोन आहेत. यातील 60 ते 65 झोन हे अद्यापही ऍक्टिव्ह आहेत. मात्र शहरात असलेल्या कन्टेन्मेंट झोनवर प्रशासनाचे पुरेशे नियंत्रण नसल्याने कंन्टेन्मेंट झोन केवळ नावापुरते झाले आहेत. विविध कामे, व्यवसाय व नोकरी, फिरणे इ साठी तेथील लोक कन्टेन्मेंट झोन बाहेर येऊन मुक्त संचार करीत आहे.
काही दिवसांआधी कन्टेन्मेंट झोन असलेल्या तेली फैलातील एक व्यक्ती चिखलगाव येथे अंत्यसंस्काराला गेली होती. त्यानंतर अख्खी मयत प्रशासनाने कॉरन्टाईन केली होती. ही घटना ताजी असतानाच नागरिकांनी यातून धडा न घेतल्याचे दिसून येत आहे. कन्टेन्मेंट झोनच्या गेटवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा चांगलाच गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र सध्या वणीमध्ये दिसून येत आहे.
पॉजटिव्ह कोरोनाचा उद्रेक थांबवण्यासाठी प्रशासनाने सक्त होणे गरजेचे असून यासह नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.