धक्कादायक – वणी उपविभागातून 8 महिन्यात 112 तरुणी व महिला बेपत्ता

वणी पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता महिला व तरुणींची संख्या अधिक

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागातून गेल्या काही दिवसांपासून तरुणी व महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या आठ महिन्यात उपविभागातून तब्बल 112 महिला गायब झाल्याची तक्रार वणी, शिरपूर, मारेगाव, मुकुटबन आणि पाटण पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली आहे. चिंतेची बाब म्हणजे बेपत्ता महिलांमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणी व महिलांची संख्या सर्वाधिक आहे. निरनिराळ्या कारणामुळे या महिला बेपत्ता झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे फूस लावून पळवून नेलेल्या किंवा घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या यात समाविष्ट नाही. ही संख्या जर यात अधिक केल्यास ही संख्या आणखी वाढते.

Podar School 2025

वणी उपविभागात वणी, मारेगाव, शिरपूर, मुकुटबन व पाटण असे 5 पोलीस स्टेशन आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2022 या कालावधीत वणी पोलीस ठाण्यात शहर व ग्रामीण भागातील 57 महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. या कालावधीत मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये 29, पाटण पोलीस ठाण्यात 12, तर मुकुटबन व शिरपूर मध्ये प्रत्येकी 7 महिला घरुन व विविध ठिकाणाहून बेपत्ता असल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. यात फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक 19 महिला व तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बेपत्ता होण्यामध्ये 70 टक्के तरूणी आणि विवाहित महिलांचा समावेश आहे. 14 ते 18 या वयोगटातील मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. अल्पवयात होणारे प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधातून प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या मुलींच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. तसेच विवाहित महिलांच्या विवाहबाह्य संबंधातून अनेक महिला प्रियकरासोबत पळून जाण्याचे पाऊल उचलतात.

आपल्या कुटुंबाचा, लहान मुलांचा विचार न करताही महिला अनेकदा असे निर्णय घेतात. घरातील भांडणे, गरीबी, पटत नसणे, अपहरण, मानवी तस्करी अशी काही कारणेही यामागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तसेच स्वतंत्र जीवनशैली हेही यामागचे एक कारण असल्याचे बोलले जाते. अलिकडे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ओळख होऊन महिलांचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले असल्याचा एक रिपोर्ट आहे.

अल्पवयीन मुलीला पळवून नेले असता त्याची नोंद बेपत्ता ऐवजी अपहरण मध्ये करण्यात येते. मात्र अल्पवयीन मुलींचे बेपत्ता किंवा पळून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा मिसिंगच्या तक्रारीवर पोलीस गंभीर्यतेने लक्ष देत नाही. फाईली पेंडिंग राहते. जर अल्पवयीन मुलगी असल्यास दबावापोटी पोलीस कार्यवाही करतात. मात्र सज्ञान असल्यास पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते. विशेष म्हणजे काही महिला स्वतःहून परत देखील येतात.

Comments are closed.