जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी तालुक्यातील रुग्णसंख्य़ेने 500 चा आकडा क्रॉस केला. आज कोरोनाचे 10 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 3 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 503 झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असूनही वणीकर अद्यापही याबाबत योग्य ती खबरदारी घेताना दिसत नसल्याचे शहरात चित्र आहे. अर्धे अधिक नागरिकांच्या तोंडावरचे मास्क अद्यपही गायबच आहे. शिवाय भाजी, फ्रुट व्यवसायिक, दुकानदार इ अर्ध्याअधिक व्यावसायिक अद्यापही मास्क वापरताना दिसत नाही. दरम्यान खर्रा खाऊन थुंकणा-यांवरही कोणताही प्रतिबंध नसल्याने हे देखील संसर्क पसरवण्यास कारणीभूत ठरताना दिसत आहे. महसूल व नगर पालिका प्रशासनानेही अद्याप कुणावरही कार्यवाही केल्याची माहिती नाही.
आज यवतमाळहून 17 अहवाल प्राप्त झाले. यात 7 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 10 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. याशिवाय आज 13 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 3 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 10 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 14 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 121 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात 503 पॉजिटिव्ह व्यक्ती झाल्यात. यातील 370 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 121 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 11 झाली आहे.
ब्राह्मणी व सरोदे चौक परिसरात कोरोनाचा शिरकाव
आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरात 8 रुग्ण आढळून आले आहेत. यात जैताई मंदिर परिसर व विराणी टॉकिज परिसरात प्रत्येकी 2 तर सिंधी कॉलनी, विठ्ठलवाडी, रजानगर, सरोदे चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहे. तर 2 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे. यात ब्राह्मणी येथील 1 चिखलगाव येथे 1 रुग्ण आहेत.
आज 35 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 35 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 121 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 45 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 66 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 17 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 72 व्यक्ती भरती आहेत.
केवळ तीन आठवड्यात 400 रुग्णांची भर
तालुक्यातील अधिकृत कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या वर गेली आहे. यात नागपूर, चंद्रपूर शिवाय इतर भागात जाऊन चाचणी करणा-यांचा समावेश नाही. त्यामुळे हा आकडा यापेक्षा कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे. 20 जून रोजी शहरात पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी रुग्णसंख्येने शतक पूर्ण केले. त्यानंतर केवळ आठवडाभरातच 1 सप्टेंबर रोजी कोरोनाने द्विशतकीय आकडा गाठला त्यानंतर केवळ 18 दिवसात आणखी 300 रुग्णांची भर पडून आज हा आकडा 500 च्या वर गेला आहे.
अर्ध्याअधिक चेह-यांवरचे मास्क गायबच !
कोरोनाच्या आकड्याने रुग्णसंख्येने 500 चा आकडा गाठला असला तरी खबरदारी घेण्यात वणीकर अद्यापही मागे असल्याचे दिसून येत आहे. भाजी, फळ, व्यवासायिक यातील अर्ध्याअधिक लोकांच्या चेह-यावर मास्कच नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी अर्ध्याअधिक लोकांच्या तोंडावरचा मास्क गायब झालेला आहे. जिल्हाधिकारी यांनी 500 रुपये दंड जाहीर केल्यानंतर दुस-या दिवशी पोलीस विभागातर्फे कार्यवाही करण्यात आली होती. मात्र पोलीस विभागातर्फे ही कार्यवाही थांबवण्यात आल्याची माहिती आहे. कोरोनाची संख्या वाढत असताना कार्यवाही थांबण्यामागचे कारण कळायला मार्ग नाही. दरम्याने नगरपालिका व महसूल विभागाने अद्याप एकाही विनामास्क व्यक्तींवर कार्यवाही केलेली नाही.