वणीतून चोरीला गेलेले 2 ट्रक यवतमाळ येथून ताब्यात, तिघांना अटक

वणी पोलीस व एलसीबीची कारवाई, अवघ्या 24 तासांच्या आत आरोपी गजाआड

जितेंद्र कोठारी, वणी: एका चारचाकी वाहनामध्ये आलेल्या चोरट्यांनी रस्त्यावर उभे असलेले दोन हायवा ट्रक चोरून नेले होते. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी छडा लावला आहे. यवतमाळ येथून चोरीला गेलेले दोन्ही ट्रक ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी यवतमाळ येथील एक तर नागपूर येथील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. वणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. 

समीर रफिक रंगरेज रा. एकतानगर वणी यांच्या मालकीचे टाटा कंपनीचे हायवा ट्रक क्रमांक MH34 BG 9452 व MH34 BG 1212 आहे. दोन्ही ट्रक वणी वरोरा मार्गावरील लॉर्डस बार समोर उभे असायचे. शुक्रवार 27 ऑक्टो. रोजी दोन्ही हायवा ट्रक उभ्या केलेल्या ठिकाणी आढळून आले नाही. तेव्हा समीर रंगरेजच्या पत्नी तस्लीम हिने आपल्या मोबाईलवर सीसीटीव्ही फुटेज चेक केले. फुटेजमध्ये पहाटे 4.35 वाजता दरम्यान चारचाकी वाहनामध्ये आलेल्या चौघे ट्रक घेऊन जात असताना दिसले. त्यावरून त्यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

चोरीला गेलेल्या ट्रकचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशन वणी व स्थानिक गुन्हा शाखेचे दोन पथक नेमण्यात आले होते. पथकाला खब-याकडून सदर ट्रक हे यवतमाळ येथील येथील आर्णी रोड बायपास जवळ असलेल्या एका धरमकाटया जवळील मोकळ्या जागेत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेचे पथक यवतमाळ येथे गेले असता त्यांना तिथे दोन्ही ट्रक आढळून आले.

सदर ट्रक मो. शगीर मो. जावीर अन्सारी रा. गुलमोहर पार्क यवतमाळ याने चोरून आणल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने अन्सारीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता. त्यांनी कुंदन ओमप्रकाश तिजारे वय २८ वर्षे, रा. हनुमान नगर, कनान नागपुर व निकेश नामदेव वासनिक वय २३ रा. आंबेडकर चौक कन्हाण नागपूर या दोन ड्रायव्हर मार्फत वणी येथून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही ट्रक एकूण किंमत 27 लाख रुपये व गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहन XUV – 300 किंमत 10 लाख रुपये असा एकूण 37 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

रेती व्यवसायातून ट्रक चोरी?
मुख्य आरोपी अन्सारी हा रेतीचा व्यवसाय करतो. त्याचा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात रेतीचा व्यवसाय आहे. समीर रंगरेज याचा वणीत रेतीचा व्यवसाय आहे. अन्सारीचा समीर रंगरेजसोबत रेतीच्या व्यवहार होता. या व्यवहारातून समीरकडे काही रक्कम घेणे होते. समीर ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होता. सध्या दुकान पाडल्याच्या प्रकरणात समीर रंगरेज कारागृहात आहे. ही संधी साधून अन्सारी याने नागपूर येथील दोन ट्रक ड्रायव्हरच्या मदतीने दोन्ही ट्रक चोरल्याची माहिती सूत्रांकडून आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, आधासिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, अजित जाधव पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वणी, यांच्या मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, भोजराज करपते, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, नरेश राउत, सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच पो.स्टे. वणी येथील सपोनि माधव शिंदे, पोलीस अंमलदार सुदर्शन वानोळे, इकबाल शेख, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, वसीम शेख, गजानन गेडाम यांनी पार पाडली

Comments are closed.