वणी एमआयडीसीतील गोदामात चोरट्यांचा डल्ला

चोरट्यांच्या रडारवर पुन्हा आले व्यावसायिक

विवेक तोटेवार, वणी: वणी एमआयडीसी मधील एका गोदमातून 24 ऑक्टोबर रोजी चोरी झाली. या चोरीत अज्ञात चोरट्याने 22 हजार रुपयांचा माल चोरून नेला. गोदाम मालकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्की भगवानदास तारुणा रा. छोरीया ले आऊट यांचे वणी एमआयडीसी मध्ये स्वस्तिक इंडस्ट्री नावाने होलसेल किराणा दुकानाचे गोदाम व वॉटर प्लांट आहे. 24 ऑक्टोबर रोजी विक्की हे दसऱ्या निमित्त दुकानाची सफाई करीत असताना त्यांना गोदामच्या एक खोलीचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन बघितले असता जुने स्टेपलायझर, यूपीएस व एक जुना कुलर चोरी गेल्याचे समजले.

त्यांनी याबाबत शेजारी व परिसरात विचारणा केली. परंतु काहीही माहिती मिळाली नाही. यावेळी दसरा व नवरात्री असल्याने विक्की यांनी 27 ऑक्टोबर रोजी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात 461, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

व्यापारी, दुकानदार चोरट्यांच्या रडारवर
गेल्या वर्षी चोरट्यांनी घरांसह दुकान फोडण्याचा सपाटा लावला होता. त्यानंतर काही काळ दुकान फोडीचे प्रकार थांबले होते. मात्र आता पुन्हा चोरट्यांनी आपला मोर्चा व्यापारी प्रतिष्ठानाकडे वळवला आहे. गेल्या आठवड्यात चोरट्यांनी वरोरा रोडवरील महेश कलेक्शन नामक कपड्याचे दुकान फोडून 2.5 लाखांचा माल लंपास केला होता. सातत्याने दुकानात होण-या चोरीमुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे.

Comments are closed.