जब्बार चीनी, वणी: पोलीस विभाग, वाहतूक विभाग, गृहरक्षक दल यानंतर आता कोरोनाने वेकोलित शिरकाव केला आहे. वेकोलिच्या उकणी येथील कोळसा खाणीत काम करणारी एक व्यक्ती आज रविवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी पॉजिटिव्ह आली आहे. आज कोरोनाचा केवळ एक रुग्ण आढळल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी हा नवीन रुग्ण (सोर्स) असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
वणीतील गुरुनगर येथील एक व्यक्ती उकणी येथील कोळसा खाणीत नोकरीला आहे. ती व्यक्ती काम करत असलेल्या विभागात घुग्गुस येथील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांच्या विभागातील व्यक्तींची आज कोरोनाची चाचणी घेण्यात आली. यात गुरुनगर येथील व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आली आहे. वेकोलित आता पर्यंत कोणतेही रुग्ण आढळून न आले नव्हते. मात्र आता वेकोलित कोरोनाचा शिरकाव झाल्याने वेकोलि कर्मचा-यांची चिंता वाढली आहे. हजारो कर्मचारी वणीहून परिसरात असलेल्या विविध कोळसा खाणीत नोकरी करतात.
आज 28 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 27 निगेटिव्ह तर एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आली आहे. आज यवतमाळ येथे 22 स्वॅब पाठवण्यात आले तर आज एकही रिपोर्ट यवतमाळहून प्राप्त झाला नाही. सध्या यवतमाळहून 85 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
आज एक आढळून आलेल्या रुग्णामुळे वणी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 96 झाली आहे. यातील 59 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर सध्या 35 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड केअर सेन्टर वणी येथे 29 रुग्णांवर उपचार सुरू असून 6 रुग्ण यवतमाळ जीएमसीला भरती आहेत.
तालुक्यात आता पर्यंत 2376 टेस्ट करण्यात आल्या असून यातील 1059 रॅपिड ऍन्टिजन टेस्ट आहेत तर आरटी पीसीआर पद्धतीने 1307 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सध्या तालुक्यात 14 कन्टेन्मेंट झोन असून यातील ग्रामीण भागात 5 तर शहरी भागात 9 झोन आहेत. आज वणीतील गुरुनगर येथे रुग्ण आढळल्याने गुरूनगर देखील सिल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.