वणीकरांना आज दिलासा… दिवसभरात एकही रुग्ण नाही

आज जिल्हाधिका-यांनी केला वणीचा दौरा...

0 5,954

जब्बार चीनी, वणी: काल वणीत सहावा रुग्ण सापडल्यानंतर आज गुरुवारी एकही रुग्ण मिळाला नाही. त्यामुळे वणीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वणीत एकून 65 लोकांना कॉरेन्टाईन करण्यात आले होते. त्यातील 56 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 9 रिपोर्ट अप्राप्त आहे. काल संध्याकाळी कोरोनाचा सहावा रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 6 व्यक्तींना परसोड येथील कोविड केअर सेन्टरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल केले. त्यांचा उद्या संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येणे अपेक्षीत आहे. दुपारी आधीचे 19 पैकी 15 रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.  4 रिपोर्ट येणे बाकी होते. त्यातील संध्याकाळपर्यंत 1 रिपोर्ट प्राप्त झाला असून उर्वरित 3 रिपोर्ट अप्राप्त आहे.

आज जिल्हाधिका-यांनी दिली वणीला भेट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी वणीचा दौरा केला. महावीर भवन व जगन्नाथ बाबा मंदीर रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राला त्यांनी भेट दिली. महावीर भवन येथे 247 कुटुंब असून येथील लोकसंख्या 953 आहे. आरोग्य विभागाच्या पाच टीम येथे कार्यरत आहे. तर जगन्नाथ बाबा मंदीर रोड येथे घरांची संख्या 90 आहे. येथील 350 लोकसंख्येसाठी चार टीम कार्यरत आहे. दरम्यान त्यांनी आढावा बैठक घेत अधिका-यांना निर्देश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, तहसीलदार श्याम धनमने, मुख्याधिकारी संदीप बोरकर, ठाणेदार वैभव जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कमलाकर पोहे ईत्यादी उपस्थित होते.

कोविड सदृष्य लक्षणं आढळल्यास प्रशासनाला माहिती द्या: जिल्हाधिकारी
प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांची पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनर तपासणी करावी. तसेच या भागातून आणखी नमुने तपासणीकरीता पाठवावे. पूर्वीपासून विविध व्याधींनी ग्रस्त नागरिकांवर विशेष लक्ष देऊन त्यांची रोज तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यन सारीची तसेच आयएलआयची लक्षणे असलेले नागरिक आढळल्यास आरोग्य यंत्रणेला माहिती द्या. तसेच सारी आणि आयएलआयची लक्षणे असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करा.
: एम डी सिंह, जिल्हाधिकारी 

सर्व नागरिकांनी बाहेर निघतांना मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

प्रतिबंधीत क्षेत्रात पाहणी करताना जिल्हाधिकारी व वणीची प्रशासकीय टीम

कोविड केअरमध्ये ‘केअरलेस’ कारभार असल्याचा आरोप
दरम्यान ज्या व्यक्ती परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये आहेत. त्यांच्या तक्रारी सुरुच आहेत. सफाई कामगार सफाई करण्यास घाबरत असल्याने तसेच कामगारांची पुरेशी संख्या नसल्याने कक्षात योग्य प्रकारे साफसफाई होत नाही, वॉशरुम वेळोवेळी स्वच्छ केले जात नाही, कॉरेन्टाईन व्यक्तींना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते असा आरोप तिथल्या व्यक्ती करत आहेत. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही विलगीकरण कक्षात का ठेवले आहे असा प्रश्न उपस्थीत करत इथल्या केअरलेस कारभारामुळे निगेटिव्ह व्यक्तीही पॉजिटिव्ह होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

‘निगेटिव्ह’ना मेडिकल टीमच्या सल्यानंतरच सुट्टी: डॉ. शरद जावळे
रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही हाय रिस्क असलेल्या व्यक्तींना आम्ही आमच्या मेडिकल टीमच्या सल्यानुसारच विलगीकरण कक्षात ठेवले आहे. हाय रिस्क मधले व्यक्ती निगेटिव्ह आल्यानंतरही दोन तीन दिवसांनी पुन्हा पॉजिटिव्ह आल्याच्या घटना याआधी समोर आल्याने याबाबत आम्ही सावध पाऊल उचलत आहोत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मेडिकल टीमच्या सल्यानुसारच आमचे कार्य सुरू आहे. साफसफाईचा आढावा घेण्यासाठी सेंटरची पाहणी करून त्याबाबत स्वत: स्विपरशी चर्चा केली आहे.
– डॉ. शरद जावळे, उपविभागीय अधिकारी वणी

सध्या वणीत कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. आज संध्याकाळी पाच नंतरही दुकाने सुरू आहेत का याचा आढावा घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात पेट्रोलिंग केले. दरम्यान विना मास्क, डबलसिट चालक यांच्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Loading...