जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाने आता उग्र रूप धारण केले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पोलीस, होमगार्ड, वेकोलि कर्मचारी, डॉक्टर, मेडिकल स्टोअरचालक यानंतर आज वणीतील एक सुपरिचित वकील हे देखील पॉजटिव्ह आले आहेत. आज वणी शहरात 11 पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. यातील 9 पुरुष तर 2 महिला आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
आज आलेल्या रुग्णांमध्ये सिंधी कॉलनी, काळे लेआऊट ब्राह्मणी रोड, पटवारी कॉलनी, रंगारी पुरा, जैन ले आऊट, जत्रा रोड, रवि नगर, विठ्ठल वाडी (एसबी लॉन जवळ), रंगनाथ नगर इत्यादी भागातील आहेत.
आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 142 झाली आहे. यातील 59 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 76 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील कोविड केअर सेंटरमध्ये 70 व्यक्तींवर उपचार सुरु आहेत तर 06 व्यक्तींवर यवतमाळ जीएमसी येथे उपचार सुरू आहे.
शहरात कोरोनाचा विळखा होतोय घट्ट
आधी केवळ बाहेरगावाहून येणा-या व्यक्तींमध्ये व मोजक्या भागात आढळणारा कोरोना आता शहरातील विविध चांगालाच पसरत आहेत. कोरोनाने आता पोलीस, वैद्यकीय, वेकोलि, विधी इत्यादी क्षेत्रात शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाने उग्र रुप धारण केले असतानाही नागरिक मात्र अद्यापही बेजबाबदारीने वागताना दिसून येत आहे. कन्टन्मेंट झोन मधून बाहेर निघणे, विना मास्क फिरणे, गृप करून गप्पांची मैफल रंगवणे इ. गोष्टींवर मात्र अद्याप अंकुश आलेला दिसत नाही. प्रशासनाने आता याकडे लक्ष देण्याची गरज असून नागरिकांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे.