गहाणखत न करताच जिनिंग मालकाला ४ कोटींचा कर्ज पुरवठा ?
वणी (रवि ढुमणे): वणी येथील यवतमाळ अर्बन बँकेच्या शाखेने संचालकाच्या सांगण्यावरून नगरातील एका जिनिंग मालकाला स्थावर मालमत्तेचे गहाणखत करून न घेता ४ कोटीहून अधिक रुपयांचा कर्जपुरवठा केला असल्याची चर्चा बँकेच्या ठेवीदारांकडून ऐकायला मिळत आहे. मात्र याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय तसेच बँकेचे काही संचालक अनभिज्ञच असल्याचे समजते. एकूणच यवतमाळ अर्बन बँकेच्या कर्ज पुरवठ्यात अत्यल्प किमतीच्या मालमत्तेवर करोडो रुपये कर्ज दिल्याचे प्रकार घडल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली आहे. परिणामी बँकेच्या कारभाराची लक्तरे यानिमित्ताने वेशीवर टांगल्या जात आहे.
सध्या यवतमाळ अर्बन बँकेच्या संचालकाने स्वतःच्या प्रा. लिमिटेड कंपनीत अनेक फेरबदल करून १ लाख भांडवल असलेल्या कंपनीच्या नावे १० कोटी व वाढीव दोन कोटी असे १२ कोटी रुपयांचे कर्ज काढून ते कर्ज इतरांच्या खात्यावर वळते केले असल्याची तक्रार वणीतील ग्राहकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. मात्र यात स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकीय पाठबळ मोठ्या प्रमाणात असल्याने या तक्रारीची अद्याप तरी चौकशी झाली नसल्याचे समजते.
नुकतेच वणी नगरातील एका जिनिंग मालकाला अर्बन बँकेच्या वणी शाखेने संचालकाच्या सांगण्यावरून बँकेला कोणतीही मालमत्ता कायदेशीर गहाणखत करून न देता चक्क ४ कोटीहून अधिक रुपयांचा कर्ज पुरवठा केला असल्याची धक्कादायक चर्चा बँकेच्या ठेवदारांमध्ये सुरू आहे. कर्जाची रक्कम कर्जदाराच्या खात्यावर जमा होण्यापूर्वी बँकेच्या अटी व शर्ती मान्य करून सदर कर्जाच्या रकमेच्या किमती एवढी मालमत्ता बँकेला नोंदणी करुन गहाण देणे बंधनकारक आहे. असे असताना कोणत्याही प्रकारच्या अटी व शर्तीची पूर्तता न करता कर्ज पुरवठा करण्यात आल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
मुद्रांक शुल्क वाचविणे व कोटींचे कर्ज उचलणे असे राजरोसपणे प्रकार बघायला मिळते आहे. सध्यातरी दुय्यम निबंधक कार्यालयाचा कर बुडाला आहे. प्रथम कर्जाची रक्कम कर्जदाराच्या खात्यात जमा करून उर्वरित सोपस्कार नंतर पार पाडणार की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकीकडे सामान्य माणसाला कर्ज देण्यासाठी बँक अनेक अटी शर्ती पूर्ण करायला लावते. इतके करून देखील त्यांना दोनचार लाख रुपयांचे कर्ज देखील मिळत नाही. तर दुसरीकडे मालमत्तेचे गहाणखत करून न देता केवळ संचालकाच्या सांगण्यावरून गावातील प्रतिष्ठीत माणसाला ४ कोटीहून अधिक रुपयांचा कर्ज पुरवठा केला जातो आहे. यावरून बँकेच्या कर्ज पुरवठा विभागात प्रचंड प्रमाणात अनियमितता असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
बँकेच्या ग्राहकांनी केलेल्या तक्रारीची कसून चौकशी झाल्यास अनेक घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. या नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँक लक्ष देणार काय ? दुय्यम निबंधक कार्यालय नियमाप्रमाणे कर आकारणी करणार काय ? असे प्रश्न बँकेच्या ठेवीदारांकडून उपस्थित केले जात आहे.