42 कोटींची कामे खनिज विकास निधीतून मंजूर

0

देवेंद्र खरवडे, वणी: वणी विधानसभाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने वणी विधानसभा क्षेत्रासाठी खनिज विकास निधीतून 42 कोटी 73 लाखाची कामे मंजूर झाली आहे. ही कामे येत्या तीन ते चार महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.

वणी विधानसभा क्षेत्र हा खनिज संपत्तीने नटलेला भाग आहे. या खनिजांच्या विपुलतेसोबत या परिसरात आरोग्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व रस्ते वाहतुकीचा प्रश्न या सारख्या गंभीर समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या समस्येवर काही प्रमाणात मात करण्यासाठी शासनाकडून या परिसरातून निघणाऱ्या खनिज संपत्तीच्या 10 टक्के रक्कम या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी देण्यात येत असतात. या वर्षी वणी विधानसभा क्षेत्रातील वणी शहर व वणी, मारेंगाव, झरी तालुक्यातील विविध कामासाठी 42 कोटी 73 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन आला आहे.

या अंतर्गत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी वणी तालुक्यातील 26 गावांना 6 कोटी 17 लाख रुपये, झरी तालुक्यातील 24 गावांना 5 कोटी 28 लाख रुपये व मारेगाव तालुक्यातील 17 गावांना 1 कोटी 55 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तीनही तालुक्यातील पांदण रस्त्यासाठी 2 कोटी रुपये व तीनही तालुक्यातील रस्ता बांधणी व सुधारणेसाठी 11 कोटी 65 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

वणी शहरातील निर्गुडा नदीवर 10 घाट बांधणे, जॅकीग ट्रॅक बांधणे व नदीचे स्वच्छतेसाठी 4 कोटी 71 लाख रुपये , शिंगाडा तलाव खोलीकरण, सौंदर्यीकरण, कालव्याची दुरुस्तीसाठी 4 कोटी 49 लाख रुपये , वणी नगर परिषदेच्या शाळांचे संगणकीकरण करण्यासाठी 27 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर मंजूर झालेल्या या खनिज विकास निधीमुळे वणी क्षेत्रातील रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.