झारखंडच्या मजुरांचा 5 दिवसापासून स्वर्णलीला शाळेत मुक्काम
RCCPL कंपनीचे 603 मजूर स्वगृही जाण्याच्या प्रतीक्षेत
जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीत काम करणारे झारखंड राज्यातील तब्बल 603 मजूर कामगार स्वगृही परतण्याचा प्रतीक्षेत आहे. गेल्या पाच दिवसापासून वणी येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेत त्यांचा मुक्काम आहे. झारखंड जाण्यासाठी त्यांना वणी येथून बसद्वारे अमरावती व तिथून रेल्वेगाडीने पाठविण्यात येणार आहे. याविषयी महाराष्ट्र व झारखंड सरकारमध्ये मजुरांच्या देवाण घेवाण बाबत चर्चा सुरू असून येत्या एक दोन दिवसात निर्णय होण्याची अपेक्षा असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार एम.पी. बिरला समूहाची आर.सी.सी.पी.एल. या सिमेंट प्रकल्पाचे झरी तालुक्यातील मुकूटबन येथे बांधकाम सुरू आहे. प्रकल्पामध्ये विविध कंत्राटदार कंपन्याद्वारे बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून हजारोच्या संख्येने कामगार आणून बांधकाम केले जात आहे. लॉकडाउन नंतर कंपनीत बांधकाम थांबविण्यात आल्यामुळे हजारो कामगार आपल्या राज्यात मिळेल त्या साधनाने निघून गेले. मात्र बिलमेट, केईपी आणि हाजीबाबा कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करणारे अंदाजे दोन हजार कामगार कंपनीतच अडकले.
काही दिवसापर्यंत या कामगारांची खाण्यापिण्याची व्यवस्था संबंधित कंपनी तर्फे करण्यात आली. परंतु लॉकडाउन 3.0 नंतर वरील कंत्राटदार कंपन्यांनी हात वर केले. त्यामुळे कामगारांनी परत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. मुकुटबन येथे प्रा. आ. केंद्रात आरोग्य तपासणी करून हजारो मजूर पायदळ वणी पोहचले.
हजारोंच्या संख्येने मजुरांचे लोंढे शहरात प्रवेश केले असता स्थानिक प्रशासनाने सुरुवातीला या विषयाला गांभीर्याने घेतले नाही. मात्र नागरिकांच्या तक्रारीनंतर मजुरांना मुकुटबन मार्गावर ताज सेलिब्रेशन व नांदेपेरा मार्गावरील स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेत क्वारन्टीन करण्यात आले. मागील पाच शाळा आवारात मुक्कामी असलेल्या कामगारांची जेवणाची सोय संबंधित कंत्राटदार कंपन्यांकडून करण्यात आली आहे. शाळेच्या मुख्यद्वारवर पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.
कामगारांकडून पैसे घेतल्याची चर्चा
स्वर्णलीला शाळेत कॉरन्टाईन करण्यात आलेल्या कामगारांकडून गावी जाण्यासाठी भाडे म्हणून प्रती कामगार एक हजार रुपये घेतल्याची खमंग चर्चा होती. या बाबत ‘वणी बहुगुणी’ प्रतिनिधीनी कामगारांना विचारले असता काही लोकांकडून पैसे घेण्यात आले होते. मात्र नंतर ते परत करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली. भाड्यासाठी पैसे घेणारे व परत करणारे व्यक्ती कोण होते ? या बाबत कामगारांनी अनभिज्ञता व्यक्त केली.