ग्रामसभेला 63 ग्रामस्थ हजर, पण ठरावामध्ये 100 नागरिकांच्या सह्या

बहुगुणी डेस्क, वणी: झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन ग्रामपंचायत अंतर्गत 266.68 हे.आर. संरक्षित वनजमीन आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला हस्तांतरित करण्यासाठी मौजा पिंप्रडवाडी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 23 जून 2023 रोजी सरपंच मीना आरमुरवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या विशेष ग्रामसभेत ठरावावर ग्रामस्थांच्या खोट्या सह्या करुन फसवणूक केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली आहे.

मौजा पिंप्रडवाडी, हिरापुर व गोविंदपूर येथील साजा क्रमांक 26, 27 आणि C – 33 मधील 467 हेक्टर वनजमीन आरसीसीपीएल कंपनीला देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत व ग्रामस्थांची संमती आवश्यक आहे. मुकुटबन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंप्रडवाडी येथील सी -33 साजा मधील 266.68 हे.आर. संरक्षित वनजमिनीपैकी 257.45 हे.आर. वन जमीन RCCPL कंपनीला हस्तांतरित करण्याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केळापूर यांचे आदेशाने ग्रामसभा घेण्यात आली होती. सभेत सविस्तरपणे समितीचा अहवाल वाचन करुन RCCPL या कंपनीला 257.45 हे. आर. क्षेत्र वळती करण्याबाबतचा ठराव घेत असतांना उपस्थित ग्रामस्थांना त्याला विरोध दर्शविला.

ग्रामसभेत सर्वानुमते असे जाहीर करण्यांत आले की, ग्रामस्थांच्या 100 सह्यांचा कोरम पूर्ण झाल्यानंतरच सभेला सुरुवात करावी. कंपनीला जेवढी वनजमीन देण्यात येत आहे तेवढी जमिनीची पर्यायी व्यवस्था RCCPL कंपनीने करून द्यावी आणि नंतरच कंपनीला वनजमीन हस्तांतरीत करावी अशी मागणी ग्रामस्थांने केली. पिंप्रडवाडी गावात सर्व शेतकरी व शेतमजूर असून त्यांच्या उदरनिर्वाहचा मुख्य साधन शेती आहे. 257 हे. आर. वनजमीनवर वावरणारे जंगली जनावरे गावाकडे वळून शेतातील पिकांची नासाडी सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याचप्रमाणे जंगल भागाला लागून असलेली हजारो हेक्टर शेती प्रदुषीत होवून पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. कंपनी द्वारे अधिग्रहण केलेल्या वन जमिनीवर खाण खोदली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाणी पातळी खालावण्याची दाट शक्यता आहे. जंगलातील तेंदूपत्ता व मोहफुल वेचून अनेक ग्रामीण उदरनिर्वाह करतात. सदर वन परीक्षेत्र टीपेश्वर अभ्यारण ते ताडोबा व्याघ्र प्रकल्प वन्य प्राणी कॉरिडॉर असून या मार्गाने वाघांचे विचरण आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सदर ठरावाला विरोध केला.

संरक्षित वन जमीन आरसीसीपीएल कंपनीला हस्तांतरित करण्यासाठी आयोजित ग्रामसभेला 100 पेक्षा जास्त ग्रामस्थांची सह्या असणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात सभेत 63 ग्रामस्थच हजर होते. कोरम नसताना सभेत उपस्थित नसलेल्या तसेच बाहेरगावी गेलेल्या काही लोकांच्या खोट्या सह्या करुन ठराव पास केल्याचा आरोप वन हक्क समितीचे सदस्य प्रशांत करमचंद बघेले यांनी केला आहे.खोटया सहया करुन जनतेची फसवणूक करणा-या मुकुटबन येथील सरपंच, सचिव यांची सखोल चौकशी करून त्यांचेवर जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी योग्य कारवाही करून जनतेला न्याय द्यावा. अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत प्रशांत बघेले व नागरिकांनी केली आहे.

Comments are closed.