ट्रक चालकास चार जणांची लोखंडी रॉडने मारहाण

वणी बहुगुणी, डेस्क: घोंसा कोळसा खाणीतून कोळसा भरून निघालेल्या ट्रकचालकाला रस्त्यात अडवून लोखंडी रॉड व हातबुक्यांनी मारहाण करण्यात आली. ट्रक चालकाच्या तक्रारीवरुन चार जणांविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज, गोलू बोर्डे व अनोळखी 2 असे आरोपींचे नाव आहे.

फिर्यादी मो. हासिम मो. इदरीस रा. मेघदूत कॉलनी चिखलगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तो मेघदूत कॉलनी येथील अब्दुल अजिज यांच्या ट्रकवर चालक म्हणून कामावर आहे. सोमवार 7 जुलै रोजी हासिमने घोंसा कोळसा खाणीतून कोळसा भरण्यासाठी ट्रकचा नंबर लावला होता. दरम्यान त्याच्या ट्रकपुढे दूसरा ट्रक लावण्याच्या कारणावरून मनोज आणि हासिम यांच्यात वाद झाला. त्यावेळी घोंसा खाणीतील कर्मचाऱ्यानी दोघांमधील वाद सोडविला.

फिर्यादी आपला ट्रक (MH12 LT3789) मध्ये कोळसा भरून वणीकडे येत असताना सायंकाळी 5 वाजता कुंभारखनी चेकपोस्टच्या समोर पुलावर एक लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी ट्रक समोर येऊन थांबली. स्कॉर्पिओ मधील चार जणांनी ट्रक चालक मो. हासिम मो. इदरीस याला ट्रकमधून खाली उतरवून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली.

दरम्यान गोलू बोर्डे याने स्कॉर्पिओ मधून लोखंडी रॉड काढून हासिफच्या डोक्यावर मारला. आरोपी मनोज, गोलू बोर्डे व त्याच्या दोन साथीदारांनी हासिमला पुन्हा इथे दिसला तर मारून टाकू अशी धमकी देऊन ते निघून गेले. घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी यांनी त्याचे मालक अब्दुल अजिज यांना सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा मालकसह पोलिस स्टेशन येऊन आरोपी मनोज, गोलू बोर्डे व इतर दोन विरुद्ध तक्रार दिली. पोलिसानी चारही आरोपीविरुद्ध कलम 324, 34, 341, 504, 506 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला.

Comments are closed.