विवेक तोटेवार, वणी: घरी पाहुणे म्हणून आलेल्या नातेवाईकानेच घरातील कपाटातील 80 हजारांचे दागिने लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील गुरुनगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी ही फिर्यादीच्या पतीची आत्याच आहे. तिच्यावर वणी पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय गंधेवार हे शहरातील गुरूनगर येथे आपली पत्नी व मुलीसोबत राहतात. 10 जानेवारीला चंद्रपूर येथे एका नातेवाईकाची तेरवी असल्याने संजय हे तिथे गेले होते. या दरम्यान त्यांची आत्या सुरेखा इमय्या इमडवार (55) रा टुंड्रा ता. किनवट जिल्हा नांदेड त्यांना भेटली. 12 जानेवारीला ते त्यांच्या आत्यासोबत वणीला आले. तिने घोंसा येथील शेती विक्रीचे पैसे घ्यायचे असल्याचे संजय यांना सांगितले.
13 जानेवारीला सुरेखा ही घोंसा येथे गेली व 14 जानेवारीला परत संजय यांच्या घरी आली. 15 जानेवारी रोजी संजय हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर पत्नी अल्का ही आपल्या मुलीसोबत रेशन घेण्यासाठी बाहेर गेली होती. यावेळी घरी सुरेखा एकटीच होती. 16 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान सुरेखा ही आपल्या गावाला परत निघून गेली.
दुसऱ्या दिवशी संजय हे कपाट साफ करीत होते त्यावेळी त्यांना तेथून सोने चोरी गेल्याचे लक्षात आले. त्याच ठिकाणी ठेवलेले नगदी 22 हजार रुपये तिथेच होते परंतु त्याच ठिकाणी ठेवलेले सोने त्यांना तिथे आढळून आले नाही. चोरी गेलेल्या सोन्याची किंमत ही 80 हजार 787 रुपये इतकी होती. घरी आत्या व्यतीरिक्त कुणीही नसल्याने त्यांचा आत्यावर संशय आला.
त्यांनी याबाबत सुरवातीला नातेवाईक असल्याने फोन करून सोने परत करण्याची विनवणी केली. परंतु सुरेखा यांनी फोनवर चोरी केली नसल्याचे सांगितले व गावात आल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्यामुळे संजय व पत्नी अलका यांनी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी सुरेखा हिच्यावर कलम 380, 507 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा: