बहुगुणी डेस्क, वणी: असे म्हणतात की दारू पिलेल्या व्यक्तीच्या कुणी नादी लागू नये. कारण पिलेली व्यक्ती काय करेल याचा काही नेम नसतो. पिलेल्या व्यक्तीच्या नादी लागणे एकाला चांगलेच महागात पडले. तालुक्यातील नेरड मध्ये ही घटना घडली. एका पिलेल्या व्यक्तीला आवाज देऊन बोलावले. मात्र पिलेल्या व्यक्तीने आवाज देणा-या व्यक्तीच्या डोक्यात गोटा हाणला. यात आवाज देणारा जखमी झाला. या प्रकरणी हल्ला करणा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिल वसंता मंगलपवार (31) हा नेरड येथील रहिवासी आहे. तो रोज मजुरी करतो. त्याच्या घराशेजारीत आरोपी दीपक राहतो. सोमवारी दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अनिल हा गावातील एका पानटपरीजवळ उभा होता. दरम्यान त्याला दीपक हा रस्त्यावरून जाताना दिसला. अनिलने दीपकला आवाज दिला. त्यामुळे दीपक पानटपरीजवळ पोहोचला.
तेव्हा दीपक हा दारू पिऊन टर्राट होता. त्यामुळे अनिलने त्याला तू येथून जा असे म्हटले. त्यावर दीपकने आधी बोलावले नंतर जा का म्हणतोय, मला आवाज का देऊन का बोलावले असे म्हणत अनिलशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेला. वाद टोकाला गेल्याने दीपकने रस्त्यावरील गोटा उचलला व अनिलच्या डोक्यात हाणला. यात अनिल जखमी झाला. वाद हाणामारीवर पोहोचल्याने पानटपरी चालक व तिथे असलेल्या व्यक्तीनी मध्ये पडत वाद सोडवला.
डोके फुटल्याने अनिलने पोलीस स्टेशन गाठले व दीपक विरोधात तक्रार दिली. मुकुटबन पोलिसांनी आरोपी दीपक विठ्ठल झाडे याच्या विरोधात बीएनएसच्या कलम 118 (1) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.
Comments are closed.