वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, अंधारवाडी शिवारात वाघाचा वावर
पांढरकवडा नजिकच्या टिपेश्वर अभियारण्यालगतच्या परिसरात दहशत
अयाज शेख, पांढरकवडा: येथील टिपेशवर अभयारण्य, कोपामंडवी लगतच्या अंधारवाडी शेतशिवारात वाघाचा वावर असल्याची चर्चा आहे. काहीच दिवसांपूर्वी हा वाघ अंधारवाडी शेतशिवारात काही शेतकरी आणि शेतसमजुरांना दिसला होते. यावेळी वाघाने तीन बकऱ्यांचा फडशा पाडला. शुक्रवारीदेखील याच भागात या वाघाने एका गाईला ठार मारले. या घटनांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे. सर्वत्र वाघाची दहशत पसरली आहे. या वाघाचे अनेकांना दर्शन परिसरातील नागरिकांना अधूनमधून होतच असते.
सध्या खरिपाचा हंगाम सुरु आहे. शेतात निंदण, डवरणी आणि फवारणीचे काम सुरु आहे. या वाघाच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये धास्तीने वातावरण पसरले आहे. गावातील नागरिकांनी वनविभागाकडे या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. सध्या आत्मरक्षणासाठी गावकरी लाठ्या काठ्या घेऊन या वाघाचा शोध घेत आहेत.
सध्याच्या काळात नागरिक आणि वाघाच्याही जीवाला धोका आहे. कोणतीही अप्रिय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने त्वरित पाऊले उचलून या वाघाला पकडावे अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वन्यजीव प्रेमी करीत आहेत.