बहुगुणी डेस्क, वणी: घरासमोर खरकटे पाणी टाकल्याने दोन कुटुंबांमध्ये चांगलाच वाद झाला. हा वाद वाढत हाणामारीपर्यंत पोहोचला. एका महिलेने दुस-या महिलेस मारहाण करण्यास सुरुवात केल्याने भांडणात दोन्ही महिलेचे कुटुंबीय पडले. या हाणामारीत फिर्यादी महिलेच्या पतीला दुखापत झाली. तर महिला किरकोळ जखमी झाली. मारेगाव तालुक्यातील अनंतपूर या गावात सोमवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणा-या चौघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी ही 35 वर्षीय महिला असून ती अनंतपूर ता. मारेगाव येथील रहिवासी आहे. ती तिच्या कुटुंबीयांसह राहते. तिच्या घराशेजारीच आरोपीचे घर आहे. सोमवारी दिनांक 24 मार्च रोजी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला ही घरी भांडे घासत होती. भांडे घासल्यानंतर तिने गेट समोर खरकटे पाणी टाकले. फिर्यादीच्या घरासमोरच आरोपीचे कुटुंबीय राहते. घरासमोर खरकटे पाणी टाकल्याने आरोपी महिला (40) चिडली. तिने माझ्या घरासमोर खरकटे पाणी का टाकले अशी विचारणा करीत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेला व आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करीत तिला झिंज्या पकडून खाली पाडत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
मारहाणीमुळे आरडा ओरड झाला. पत्नीचा आवाज ऐकून फिर्यादीचा पती धावत भांडण सोडवण्यास आला. फिर्यादीचा पती मध्ये येताच आरोपी महिलेचा पती व दोन्ही मुलं धावली. त्यांनी फिर्यादीच्या पतीचा हात मुरगळत भिंतीवर ढकलले. यात फिर्यादी महिलेच्या पतीचे बोट फ्रॅक्चर झाले. दरम्यान वाद वाढून हाणामारीवर गेल्याने शेजारी मध्ये आले व त्यांनी दोन्ही कुटुंबीयांची समजूत घालून वाद थांबवला. मात्र आरोपीच्या पतीने जीवे मारण्याची धमकी दिली.
चार महिन्यांपूर्वीही झाला होता वाद
फिर्यादीच्या कुटुंबीयांचे व आरोपीच्या कुटुंबीयांचे आपसात पटत नाही. चार महिन्याआधी या दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला होता. त्यावरून फिर्यादीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या कुटुंबीयांवर मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. चार महिन्याआधी झालेला वाद पोलीस स्टेशन व कोर्टात गेल्याने या दोन्ही शेजा-यांमधले संबंध टोकाला पोहोचले आहे. त्यामुळे आरोपीचे कुटुंबीय मनात राग धरून असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जीवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी महिलेने मारेगाव पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी मारहाण करणारी पत्नी, पती व त्यांच्या दोन मुलांवर बीएनएसच्या कलम 115(2), 117(2), 3(5), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
वणी व परिसरातील ताज्या बातमी आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉईन करा…
Comments are closed.