नोकरीचे आमिष दाखवून मारेगाव येथील महिलेची मध्यप्रदेशात विक्री

भास्कर राऊत, मारेगाव: नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची 1.5 लाखात विक्री केल्याची घटना मारेगाव येथे उघडकीस आली. पीडित महिलेला मध्य प्रदेश येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मात्र पीडितेच्या मुलीने संधी साधत याबाबत तिच्या आजीला माहिती दिली व हे संपूर्ण प्रकरण समोर आले. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार 4 आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की पीडित महिला (27) ही आपल्या 11 वर्षीय मुलीसह मारेगाव येथे भाड्याने राहते. ती रोजमजुरी करून आपला व आपल्या मुलीचा उदरनिर्वाह करते. पीडित महिला ही चांगल्या नोकरीच्या शोधात होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिची भेट दोन महिलांशी झाली. यातील एक मारेगाव तालुक्यातील तर दुसरी भद्रावती येथील रहिवासी आहे. त्यांनी तिला एका कंपनीत लावून देतो असे आमिष दाखवले. मात्र त्यांनी कंपनी मध्यप्रदेश येथील उज्जैन येथे असल्याचे सांगितले.

चांगला पगाराची नोकरी असल्याचे सांगितल्याने पीडित महिला मध्यप्रदेश येथे जाण्यास तयार झाली. ती व तिची मुलगी भद्रावती येथे दोन ओळखीच्या महिलांना भेटायला गेली. 12 एप्रिल रोजी त्या दोन महिला त्या दोघींना मध्यप्रदेश येथील जावरा जि. रतलाम येथे घेऊन गेल्या. तिथे त्यांनी पीडित महिलेला जीतू पाली नामक एका इसमाला 1.5 लाख रुपयांमध्ये विकले.

महिलेवर बंद खोलीत अत्याचार
पाली नामक इसमाने पीडित महिलेला एका खोलीत बंद केले. तिथे तो तिच्यावर रोज अत्याचार करायचा. नकार दिल्यास तो तिला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. आपली फसगत झाली हे पीडितेच्या लक्षात आले. मात्र तिला पळून जाता येत नव्हते. दरम्यान पीडितेची 11 वर्षीय मुलगी हिने संधी साधत तिच्या आजीला मोबाईलवर कॉल केला. आईची झालेली फसगत व अत्याचार याबाबत तिने आपल्या आजीला माहिती दिली. पीडितेच्या आईने तातडीने चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशन गाठले व या प्रकरणी तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपी नारायण शेडमाके, बननाबाई आत्राम ता. मारेगाव, रियाबाई रा. भद्रावती जि चंद्रपूर व जीतू माली रा. पिडसावा ता जावरा मध्यप्रदेश यांच्या विरोधात भादंविच्या कलम 370, 344, 366, 368, 376 (2) (N), 506, 376 नुसार गुन्हा दाखल केला. दिनांक 21 एप्रिल रोजी सदर प्रकरण मारेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राजेश पुरी यांनी एक पथक तातडीने मध्यप्रदेश येथे पाठवले. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.