संशयाचे भूत मानगुटीवर बसले, प्रेयसीचा मोबाईल पाहताच कांड घडले !

जितेंद्र कोठारी, वणी: प्रिया बागेश्वर खून प्रकरणी अटक करण्यात आलेला प्रियकर विनोद शितोळे याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वणी पोलिसांनी बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली होती. 29 मे रोजी जैन ले आऊट येथील कृष्णा अपार्टमेंटमध्ये 25 वर्षीय तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तरुणीचा 2 ते 3 दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे अहवाल डॉक्टरांनी दिला. तसेच तरुणीच्या डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.

मृतक तरुणी प्रिया बगेश्र्वर उर्फ आरोही वानखेडेच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड व कुटुंबियांच्या बयाणावरून तपास पथकाने घटनेच्या 24 तासाच्या आत हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून विनोद रंगराव शितोळे नावाच्या युवकाला अटक केली. विनोद शितोळे हा प्रिया बागेश्वरचा प्रियकर होता. मात्र प्रियकरानेच हत्या केली.

असे झाले फेसबुकवरून प्रेम…
प्रिया बागेश्वर उर्फ आरोही वानखेडे (25) ही वरोरा येथील रहिवासी होती. तिचे आरोही वानखेडे नावाने फेसबुकवर अकाउंट होते. या अकाउंटवरून ती नेहमी तिचे विविध पोषाखातील फोटो अपलोड करायची. तिचे अकाउंट पाहून अनेक लोक तिच्याकडे अट्रॅक्ट व्हायचे. अशातच तिच्या अकाउंटवर एक दिवस विनोद शितोळे या तरुणाची फ्रेन्ड रिक्वेट आली. पुढे एकमेकांना मॅसेज यातून दोघांची मैत्री झाली होती. पुढे त्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. त्यातून ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले.

प्रिया ही गेल्या काही काळाआधी वरो-याहून वणी येथे शिफ्ट झाली होती. दोन तीन महिन्याआधीच ती ब्राह्मणी रोडवरील क्रिष्णा अपार्टमेंट इथे राहायला आली होती. प्रिया आणि विनोद रिलेशनशीपमध्ये आल्यावर विनोद हा अनेकदा प्रियाला भेटायला वणी येथे यायचा. तर बरेचदा विनोद हा प्रियाच्या फ्लॅटवरच थांबायचा.

संशयाचे भूत बसले मानगुटीवर
प्रिया ही बिनधास्त मुलगी होती. तिला फेसबूकवरून फोटो अपलोड करायला आवडायचे. तिचे फोटो बघून अनेक लोक तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत तिच्याशी चॅटिंग करीत. शिवाय तिला बरेच फोन कॉल देखील यायचे. दुसऱ्या मुलांसोबत फोनवर बोलणे व चॅटिंग करण्यावरून प्रिया व विनोदमध्ये बरेचदा कुरबुरी व्हायच्या. घटनेच्या दिवशी प्रियाचा मोबाईल विनोदच्या हाती लागला. मोबाईलमध्ये त्याला काही संशयीत कॉल व संशयीत चॅटिंग आढळले.

घटनेच्या दिवशी घडला थरार…
त्यावरून प्रिया व विनोदमध्ये जोरदार भांडण झाले. तु माझ्यासोबत रिलेशनशीपमध्ये असताना इतरांशी तु बोलतेच कशी? असा सवाल तो करत होता. पुढे वाद विकोपाला जाऊ विनोदने रागाच्या भरात प्रियाला मारहाण केली. त्याने तिला खाली पाडून तिचे डोके जमिनीवर जोरात आदळले. यात ती गंभीर जखमी होऊन डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मात्र संशयाचा भूत मानगुटीवर बसलेल्या विनोदने प्रियाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर फ्लॅटला बाहेरून कुंडी लावून तो आपल्या गावी पळून गेला.

दोन दिवसानंतर अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्यावर आधी दुर्गंधी सुटली. रात्री ही दुर्गंधी वाढून संपूर्ण बिल्डिंगमध्येच पसरली. बिल्डिंगमधील रहिवाशांना प्रियाच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी याची माहिती फ्लॅटमालकाला दिली. सकाळी फ्लॅटमालक अपार्टमेंटमध्ये आले. परिसरातील नागरिकांना काहीतरी बरेवाईट घडले असल्याचा संशय होताच. फ्लॅटमालकाने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन फ्लॅटचे बाहेरुन लावलेले दार उघडले व आत प्रवेश केला. त्यानंतर हे संपूर्ण हत्याकांड उघडकीस आले.

अवघ्या 24 तासांच्या आत खुनाचा छडा
खुनाच्या या घटनेचे कोणतेही प्रत्यक्षदर्शी किंवा सीसीटिव्ही फुटेज नव्हते. मात्र तपास अधिकारी सहा.पो.निरीक्षक माधव शिंदे यांनी तांत्रिकरित्या तपास केला असता ती विनोद नावाच्या एका व्यक्तीशी रिलेशनशीपमध्ये असल्याचे त्यांना कळले. शिवाय फ्लॅटमधले मोबाईल लोकेशनचा शोध घेऊन अवघ्या 24 तासातच मारेकरी प्रियकराला पोलिसांनी अटक केली.

प्रिया ही आरोही वानखेडे नावाने फेसबूकवर वावरायची. शिवाय तिच्या घरी आरोही वानखेडे नावाने आधार कार्ड देखील आढळून आले. तर तिच्या आईच्या मते तिचे नाव प्रिया बागेश्वर आहे. ती आरोही वानखेडे हे नाव का लावायची याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. 

Comments are closed.